राजेंद्र झेंडे,
दौंड : महान्युज लाईव्ह
पुण्याची पीएमपीएलच्या हडपसर ते पाटस – कुरकुंभ या बसचे काल मोठ्या थाटामाटात उद्घाटन माजी आमदार रमेश थोरात यांनी केले,मात्र उद्घघाटानंतर ही बस दुसऱ्या दिवशी धावलीच नाही, परिणामी या बस मधुन प्रवास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यी, शेतकरी व प्रवासी यांची घोर निराशा झाली. बस न आल्याने विद्यार्थी शेतकरी प्रवाशी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
दौंड तालुक्यातील पाटस येथे हडपसर ते कुरकुंभ पर्यंत पीएमपीएलच्या बससेवेचा शुभारंभ गुरूवारी ( दि.२४ ) दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांया हस्ते रेबीन कापून मोठ्या थाटामाटात पार पडला. ही बस आजपासून नियमितपणे सुरू राहणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. मात्र उद्घघाटनानंतर जशी ही बस हडपसरला गेली तसी ती परत आलीच नाही. या बसने गुरुवारी एकच फेरी केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ( दि.२५ ) या बसने प्रवास करण्याच्या आशेने कुरकुंभ, पाटस, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे कुसेगाव, कानगाव, जिरेगाव या भागातील विद्यार्थी, शेतकरी व प्रवासी बस स्थानकावर आले. मात्र सकाळपासून पीएमपीएल ची बस आलीच नाही त्यामुळे या प्रवाशांना बसची वाट बघून इतर वाहनांमधून प्रवास करण्याची वेळ आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, शेतकरी व प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोल प्लाझा कंपनीच्या टोल वसुली नाक्यावर पीएमपीएलच्या बसला टोल आकारण्यात येत आहे. टोल नाक्यावर पाटस वरून कुरकुंभकडे जाण्यासाठी हा टोल भरावा लागणार आहे. हा टोल पीएमपीएलच्या बसला आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याचे व्यवस्थापकांकडून सांगण्यात येते. या बसला टोल मधून सूट मिळावी अशी या व्यवस्थापकांनी यांनी केली आहे. दरम्यान, बस सुरू होण्यापूर्वीच या संदर्भात बस व्यवस्थापक, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करणे गरजेचे होते, त्यामुळे पीएमपीएलच्या बसचे उद्घाटन होऊनही दुसऱ्या दिवशी बस सुरू न झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
दरम्यान, याबाबत शेवाळवाडी- हडपसर डेपोचे वाहतुक व्यवस्थापक सोमनाथ वाघोले म्हणाले की, पाटस येथील टोल नाक्यावर बसला टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून टोल आकारणी करण्यासंदर्भात जोपर्यंत तोडगा काढला जात नाही तो पर्यंत बस सुरु करता येणार नाही. आजी-माजी आमदारांनी याबाबत लक्ष घालून ही समस्या सोडवावी.