शिरूर : महान्यूज लाईव्ह
भीमा नदीच्या पात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर कुजली असून या जलपर्णीमुळे प्रचंड दुर्गंधी परिसरात पसरली जात आहे यामुळे नागरिकांना श्वास घेणे देखील मुश्किल झाले असून प्रशासनाने गांभीर्याने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी केली आहे.
शिरूरच्या पूर्व भागात मांडवगण फराटा, सादलगाव येथील भीमा नदी पात्रात ढापे टाकले आहे.ढापे टाकले असल्याने बंधाऱ्यात पाणी अडविले गेले आहे.गेल्या काही दिवसांत मांडवगण फराटा येथील भीमा नदी पात्रात जलपर्णी मोठ्याप्रमाणावर अडकली असून ही जलपर्णी सध्या कुजत असून त्याचा परिणाम दूरवर परिसरात झाला असून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.या कुजलेल्या जलपर्णीमुळे डासांचाही उपद्रव होत असून हा त्रास दरवर्षी भीमाकाठावरील असणाऱ्या गावांना होतो.
अनेक शेतकऱ्यांच्या विद्युतपंपात जलपर्णी अडकून विद्युत पंप देखील बंद पडले जातात. ही अडकलेली जलपर्णी काढताना अनेकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पाण्यामुळे जनावरांना देखील त्रास होत असून पाणी पिण्यासाठी जनावरे धजावत नाहीत. मांडवगण फराटा,वडगाव रासाई, नागरगाव, बाभूळसर बुद्रूक,गणेगाव दुमाला, सादलगाव आदी गावांना त्रास मोठ्या प्रमाणावर होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मांडवगण फराटा येथील भीमानदी पात्रालागत स्मशानभूमी असून येथे शेजारी दशक्रिया विधी कार्यक्रम देखील केले जातात मात्र सध्या प्रचंड दुर्गंधीने येथे क्षणभरही थांबता येत नसून प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या जलपर्णीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य अशोक जगताप यांनी केली आहे.