माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २४ – बनेश्वरची येथील पारंपरिक पद्धतीने होणारी महाशिवरात्री यात्रा कोरोनामुळे गेल्या वर्षी रद्द झाली होती. मात्र यावर्षी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत १ मार्च रोजी येणारी बनेश्वरची महाशिवरात्री यात्रा साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात्रा देवस्थान ट्रस्टच्या वतीने उत्सवासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार बनेश्वर ( ता. भोर ) येथील महाशिवरात्री यात्रा साजरी करण्याचा निर्णय श्री. बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम दातार, उपाध्यक्ष हनुमंत कदम, सचिव अनिल गयावळ, सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, महसूल विभागाच्या तलाठी नेहा बंड, जेष्ठ नागरिक भिकोबा हाडके, निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत कदम, आबासाहेब यादव, मंदिराचे गुरव रवींद्र हारगुडकर, राजगड पोलीस स्टेशनचे सहायक उपनिरीक्षक संजय ढावरे, नसरापूर ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, वनविभाग, महावितरणचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बनेश्वर येथील शंभू महादेव मंदिरामध्ये प्रांतधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते दि. १ मार्च रात्री १२ वाजता शासकीय पूजा होणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी पहाटे सहा वाजेपर्यंत गाभाऱ्यामध्ये अभिषेक, पूजा व दर्शन चालू राहील.
सहापासून रात्री अकरा वाजेपर्यंत गाभारा बंद राहील. मात्र दिवसभर भाविकांना बाहेरून दर्शनास दर्शन वारीतून सोडण्यात येईल. यात्रेदिवशी परंपरेनुसार दुकाने थाटली जाणार आहे तसेच मंदिर परिसरात वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी कामथडी चौक आणि मेनआळी येथील प्रवेशद्वारापासून वाहनांना बंदी असणार आहे.
कमानीपासून पांढरापट्टा मारून विक्रेते स्टॉल लावली जाणार असून.सुरक्षेकरिता सीसीटीव्ही व्यवस्था राहणार आहे. स्वच्छता अभियान राबविण्याची नियोजनाची जबाबदारी वनखात्याकडे राहणार असून महावितरणकडून यात्रेच्या लोडशेडिंग न करता मंदिरात परिसरात शार्टसर्किट व इतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ४ ते ५ कर्मचारी मंदिरात उपस्थित राहणार आहे. यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजगड पोलीस तैनात राहणार आहे.
दरम्यान, कोरोनामुळे गेल्या वर्ष येथील महाशिवरात्री अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये पार पडली होती. मात्र यंदा खुली यात्रा पार पडणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण असून मोठ्या संख्येनं गर्दी होणार असल्याने भाविकांनी कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.