बारामती : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात शहाजी मुगुटराव काकडे यांच्याविरोधात फसवणूकीच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अभिजीत देशमुख यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कौटुंबिक जमीन वाटपातील 3 हेक्टर 44 आर (साडे आठ एकर ) जमिनीच्या फसवणूकप्रकरणी अभिजीत देशमुख यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस करत आहेत.
देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगीता बापुसाहेब देशमुख (सौ.ऐश्वर्या उर्फ संगीता महेंन्द्रसिंह जाधवराव ), 2) मनिषा बापुसाहेब देशमुख (सौ.मनिषा राजेंद्र शिंदे ) 3)अनिता बापुसाहेब देशमुख (सौ.अनिता प्रमोद बर्गे), या तिघींचे नावे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स होते.
त्यापैकी बहीण मनिषा बापुसाहेब देशमुख (सौ.मनिषा राजेंद्र शिंदे) अनिता बापुसाहेब देशमुख (सौ.अनिता प्रमोद बर्गे), यांचे नावे सोमेश्वर साखर कारखान्यात असलेल्या शेअर्सपैकी प्रत्येकी एक एक शेअर्सचे 5000/- रुपये असे एकुण दोन शेअर्सचे 10,000/- रुपये रक्कम ही फिर्यादीची बहीण सौ.मनिषा व सौ.अनिता यांचे बॅंकेत खाते असताना देखील त्यांचे कोणत्याही बॅंकेत खाते नसल्याचे भासवुन बनावट अर्ज करुन रोख स्वरुपात शहाजीराव मुगुटराव काकडे यांनी सोमेश्वर साखर कारखान्यातुन त्याचे कारखान्यावरील प्रशासनातील अधिका-यांशी असलेल्या हितसंबधाचा वापर करुन रोख स्वरुपात शेअर्सचे पैसे दिनांक 16/11/2011 रोजी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथुन काढुन घेतले.
तसेच फिर्यादीची आई कै.सुमन बापुसाहेब देशमुख यांच्या मौजे निंबुत ता.बारामती जि.पुणे येथील शेतजमीन जुना गट नं 171 त्याचा नवीन गट नं 167 मध्ये 3 हेक्टर 44 आर (साडेआठ एकर जमीन) ही दिनांक 23/3/1994 रोजी बारामती सब रजिस्टरी ऑफीस बारामती येथे बनावट असाईमेंट डीड करुन सदरचा दस्त क्र 930 अन्वये हा फिर्यादीचे व फिर्यादीच्या आईचे परस्पर करण मेघराज काकडे व अमेय सुरेश काकडे (दोघे सध्या रा.कोल्हापुर) यांना परस्पर विक्री करुन फिर्यादीची फिर्यादीच्या कुटुंबियांची आर्थीक फसवणुक केली आहे अशी फिर्याद देशमुख यांनी दिली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फौजदार शेलार पुढील तपास करत आहेत.