शिरुर : महान्यूज लाईव्ह
शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरुर यांच्या सयुंक्त विद्यमानाने सन २०२२ पासून लेखिका मालतीबाई बेडेकर उर्फ विभावरी शिरुरकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरुरचे कार्यवाह लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस मराठी साहित्य परिषद शिरुर शाखेचे अध्यक्ष निलेश खाबिया,उपाध्यक्ष प्रा.सतीश धुमाळ,कार्याध्यक्षा प्रा.क्रांती पैठणकर,श्यामकांत वर्पे आदी उपस्थित होते.
यावेळी खाबिया म्हणाले की, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान गेली पंचवीस वर्ष साहित्य कला व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात काम करत आहे. यंदा प्रतिष्ठानला स्थापना होवून २५ वर्ष पूर्ण होत आहे.प्रतिष्ठानचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यंदाच्या वर्षापासून मराठी साहित्यात आपल्या लेखनातून अमूल्य अशी भर टाकणा- या साहित्यिकास विभावरी शिरुरकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विभावरी शिरुरकर यांचे मराठी साहित्यात मोठे योगदान असल्याचे खाबिया म्हणाले. त्याच बरोबर विभावरी शिरुरकर ज्या परिसरात शिरुर शहरात वास्तव्यास होत्या, त्याठिकाणी तसा फलक नगरपरिषदेने लावावा अशी मागणी त्यांनी केली.
या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पंचवीस हजार रुपये असे असणार असून याबाबत लवकरच चार सद्स्यांची निवड समिती सुद्धा साहित्य परिषद शाखा शिरूर आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात येईल असे ते म्हणाले.