मुंबई : महान्यूज लाईव्ह
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. यावेळी निवडणूक प्रचाराच्या काळात सोनभद्रचे आमदार चक्क व्यासपीठावर कान पकडून उठाबशा काढतानाचे दृश्य काल वृत्तवाहिन्यात आणि सोशल मिडियावर सगळीकडे दिसले. गेल्या पाच वर्षात कार्यकर्त्यांकडे ढुंकूनही न पाहिलेल्या आमदारसाहेबांना अचानक कार्यकर्त्यांचे महत्व कळून आले.
उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्ट्सगंज विधानसभा सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. भुपेश चौबे हे येथील भाजपाचे आमदार आहेत. त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळाले आहे. गेल्या पाच वर्षात स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेकडे बहुधा त्यांनी दुर्लक्ष केलेले दिसते. त्यामुळेच आता पुन्हा आमदार होताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळेच काल भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी तक्रारींचा भडीमार केल्यानंतर अचानक आमदारसाहेब उठले. त्यांनी कान पकडले आणि व्यासपीठावरच उठाबशा काढायला सुरुवात केली. व्यासपीठावरील नेत्यांनी त्यांना असे न करण्याची विनंती केली. त्यानंतरही ते हात जोडतच खाली बसलेले दिसले.
सत्तेसाठी राजकारणी कोणत्याही थराला जातात. कार्यकर्त्यांना असे भावनिक आवाहन केल्यानंतर तरी चौबेसाहेबांना पुन्हा एकदा सत्तासुंदरीची प्राप्ती होईल की नाही ते आता १० मार्चला मतमोजणीनंतरच कळेल.