मुंबई : महान्यूज लाईव्ह
पहाटे चार वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिकांच्या घरी पोचले, आणि टिव्ही चॅनेलला दिवसभरासाठीची बातमी मिळाली. आज दिवसभर मराठी टिव्ही चॅनेलवर फक्त नवाब मलिकच होते. आता रात्री नऊ वाजत असताना न्यायालयाने मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी दिल्याची बातमी येते आहे. पण आजचा दिवस संपला असला तरी आज घडलेल्या घडामोडी पाहता पुढील काही दिवस सगळ्या माध्यमांमध्ये नवाब मलिक टॉपवर असणार आहेत.
आज पहाटे चार वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिकांच्या घरी पोचले. त्यानंतर सात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. जवळपास सात ते साडेसात तासांच्या चौकशीनंतर त्यांना ३ वाजता त्यांना जे जे रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना सेशन कोर्टात नेण्यात आले.
तेव्हापासून रात्री नऊ वाजेपर्यंत सेशन कोर्टात सुनावणी सुरु राहिली. सात वाजेपर्यंत दोन्ही बाजुंच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडले. त्यानंतर दोन तास न्यायाधिशांनी निकाल वाचन केले. यानंतर नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.
हे होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी आणि भाजपा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. व्टिटरवर लढाई, न्यूज चॅनेल्सवर बाईट्स सुरु होते. भाजपा नेत्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा मागितला. तर महाविकास आघाडीने नवाब मलिकांच्या पाठीशी उभे रहात उद्या गांधी पुतळ्यापाशी आंदोलनाची भुमिका घेतली. त्यानंतर प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर आंदोलनाचीही घोषणा झाली.
आजचा सगळा दिवस यात संपला असला तरी पुढील काही दिवस वृत्तवाहिन्यांना भरपूर कामाची तरतूद करून गेला आहे.