महान्यूज लाईव्ह विशेष
राजकीय तसेच सनसनाटी बातम्यांच्या गदारोळात अत्यंत महत्वाची माहिती अनेकदा दुर्लक्षली जाते. तशीच ही एक बातमी आहे. नवाब मलिकांना झालेली अटक, युपीतील मतदान आणि युक्रेनमधील तणाव यांच्या गोंगाटापासून बाजूला जाऊन याकडे पाहिले तर आपल्या मुलांच्या भविष्याची वाट अनेकांना या बातमीत पाहता येईल.
रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा अससेल्या मुकेश अंबानींनी आज एक भविष्यवाणी केली आहे. भारताच्या भवितव्याबाबत बोलताना त्यांनी पुढील १० ते २० वर्षात भारतात रिलायन्सऐवढ्याच मोठ्या किमान २० ते ३० कंपन्या आपल्याला उदयास आलेल्या दिसतील असे विधान केले आहे.
मुकेश अंबानी हे उद्योजक आहेत, कोणी राजकारणी नाहीत, त्यामुळेच त्यांचे हे विधान गांभिर्याने घेतले पाहिजे. त्यांच्या या विधानाला पुष्टी देणारी एक गोष्ट काही दिवसांपूर्वीच घडली आहे, ती म्हणजे गौतम अडानी यांची संपत्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त होऊन ते अंबानींच्या पुढे गेले आहेत.
आशिया इकॉनॉनिक डॉयलॉग २०२२ च्या प्लॅटफॉर्मवर मुकेश अंबानी बोलत होते. आपल्या वक्तव्यात त्यांनी पुढे सांगितले.
‘ मागील २० वर्षात भारत आयटीच्या क्षेत्रात सुपरपॉवर म्हणून पुढे आला. पुढच्या २० वर्षात भारत उर्जा आणि लाईफ सायन्सच्या क्षेत्रात सुपरपॉवर म्हणून पुढे येईल. ‘
` उद्योजकीय उत्साह, सरकारी अनुकुल धोरणे आणि आवश्यक भांडवलाचा पुरवठा या तीन गोष्टींच्या आधारावर भारत स्वच्छ उर्जेच्या क्षेत्रातील मोठा निर्यातदार बनू शकतो. याच क्षेत्रातील २० ते ३० कंपन्या रिलायन्सऐवढ्या मोठ्या असतील. ‘
अंबानी पुढे म्हणाले, याच स्वच्छ उर्जेच्या आधारावर भारत जागतिक सत्ता बनेल, यातूनच नवे रोजगार उभे राहतील, यामुळे सध्याचा भारताचा होणारा इंधनावरील खर्च पुर्णपणे थांबून भारतच जगाला इंधन पुरवठा करेल, असे स्वप्न त्यांनी रंगविले आहे.
रिलायन्स ग्रुप यासाठी अगोदरच कामाला लागला आहे. अशा प्रकारच्या उद्योगांसाठी लागणाऱ्या मुलभूत बाबी उभारण्यासाठी या उदयोगाने ६० हजार कोटीची गुंतवणूक चार गिगा फॅक्टरीज उभ्या करण्यासाठी केली आहे. त्याचबरोबर १५००० कोटींची गुंतवणूक भविष्यातील तंत्रज्ञान, भागीदारी तसेच व्ह्यल्यू चेन उभी करण्यासाठी केली आहे.
यासाठी सरकारने हायड्रोजन एनर्जीला एक किलो प्रतिडॉलर किंमतीपेक्षा खाली आणण्याच्या दिशेने काम केले पाहिजे.
मुकेश अंबानींच्या उद्योजकीय कौशल्याबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारणच नाही. त्यामुळे त्यांचे हे भाषण देशातील उद्योगांची भविष्यातील दिशा दाखविणारे आहे.