संगमनेर : महान्यूज लाईव्ह
पुणे – नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोत बारावीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत बोर्डाकडून काहीही माहीती अजूनही देण्यात आलेली नाही. त्यांनी माहिती दिल्यानंतरच याबाबत स्पष्टता येऊ शकणार आहे.
मध्यप्रदेशातील भोपाळ येथून हा टेम्पो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक परिक्षा मंडळाच्या प्रश्नपत्रिका घेऊन येत होता. चंदनापूरी घाटात हॉटेल साईप्रसादसमोर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टेम्पोने पाठीमागील बाजूने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी पोचून त्यांनी आग आटोक्यात आणली.
पेपरफुटी टाळण्यासाठी आणि गोपनियता म्हणून प्रश्नपत्रिका छपाईचे काम महाराष्ट्राऐवजी मध्य प्रदेशात देण्यात आले होते.