कर्जत : महान्यूज लाईव्ह
स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने बोलावून दहा लाख रोख आणि मोबाईल पळवून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील एकास कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.
हा गुन्हा ९ फेब्रुवारी रोजी अहमदनगर ते सोलापूर रोडजवळ दोन ते तीन किमी अंतरावरील शेतात घडला.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आंबिवली येथील बांधकाम व्यावसायिक संतोष रामचंद्र घुडे यांना विठ्ठल जाधव असे नाव नाव सांगणाऱ्या व्यक्तीने स्वस्तात सोने देतो म्हणून या ठिकाणी बोलावून घेतले होते. मात्र या ठिकाणी विठ्ठल जाधव याच्या सोबत असलेल्या दहा, बारा अनोळखी लोकांनी संतोष घुडे आणि त्याच्या बरोबर असलेल्या व्यक्तीस लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यांचे डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील रोख रक्क्क दहा लाख रुपये आणि तीन मोबाईल हॅन्डसेट त्यांच्याकडून हिसकावून घेतले.
या प्रकरणी संतोष घुडे यांनी ११ फेब्रुवारीला फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्यातील आरोपी सचीन आल्या पवार हा कुळधरण गावाच्या परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कर्जत पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच इतर आरोपींची नावेही सांगितली. या आरोपीला न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोसई अमरजीत मोरे व महादेव कोहक हे करत आहेत.