बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात चोरट्यांनी आता देवावरच डोळा ठेवलेला दिसतो आहे. बारामती तालु्क्यातील प्रसिद्ध शिरसाई मंदिरात अगदी आरामात येऊन चोरी करणाऱ्यांचा व्हिडिओ मागील दोन महिन्यापूर्वी सगळ्यांनी पाहिला होताच. त्यानंतर सोमवारी ( दि. २१ ) रोजी पहिल्यांदा देवाच्या पाया पडून नंतर दानपेटी चोरणाराचा व्हिडिओही सोशल मिडियावर फिरत होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सकाळी वडगाव निंबाळकर येथील विष्णू पंचायतन मंदिरातील पंचधातूची मुर्ती चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वडगाव निंबाळकर येथील गावठाण भागात मुख्य बाजारपेठेत हे पुरातन मंदिर आहे. मंदिराची अवस्था वाईट आहे. ना सीसीटिव्ही कॅमेरे आहेत, ना सुरक्षेची काही व्यवस्था. मंदिराचे व्यवस्थापन खासगी आहे.
सोमवारी रात्री दिवाबत्ती केल्यानंतर पुजाऱ्याने मंदीर बंद केले. त्यानंतर सकाळी पुजेसाठी गेल्यानंतर राजेंद्र काकडे यांना गाभाऱ्याचे दार उघडे दिसले. त्यानंतर ही चोरी उघडकीस आली.
चोरीला गेलेली मुर्ती पंचधातूची होती. ही शंभर वर्षे जुनी मुर्ती असल्याने लोकांमधून या चोरीप्रकरणी संतप्त भावना व्यक्त होत आहेत.