महान्यूज लाईव्ह विशेष
‘ तो मी नव्हेच ‘ हे नाटक १९६२ साली रंगमंचावर आले. आजही या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होतात. ‘ देवमाणूस ‘ ही टिव्ही चॅनेलवरील मालिकाही खुप लोकप्रिय झाली होती. त्याचा दुसरा भागही आता सुरु झाला आहे. ही मालिका आणि नाटक यांचे सूत्र एकच होते, ते म्हणजे स्त्रीयांची फसवणूक.
या ‘ तो मी नव्हेच ‘ नाटकात एक संवाद आहे. ‘ बायका भाजी निवडताना जेवढी काळजी घेतात, तेवढीही नवरा निवडताना घेत नाहीत. ‘ या नाटकात लखोबा लोखंडे नावाचा माणूस वेगवेगळी रुपे घेऊन अनेक बायकांशी लग्न करतो, त्यांचे पैसे, दागिने हडप करतो, असे दाखवले आहे. हे नाटक एका सत्य घटनेवर आधारीत होते. काझी नावाच्या एका व्यक्तीने मुळात असे प्रकार १९५० च्या दशकात केलेले होते.
‘ देवमाणूस ‘ हीदेखील वाईमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत मालिका होती. पण अर्धातच पुढे या मालिकेत इतके पाणी घातले गेले की मुळ घटनेशी या मालिकेचा काहीही संबंध उरला नाही. वाईमध्ये एका डॉक्टरने अनेक महिलांचे खून केले होते.
आपल्याला एक संसार सांभाळताना नाकीनऊ येतात. पण काही माणसे असे अनेक संसार मांडतात, मांडतात, पुन्हा मांडतात. आणि ऐवढे सगळे करून फायद्यात आणि आनंदातही राहतात. लखोबा लोखंडे होऊन गेल्याला आता ७० वर्षे व्हायला आली. पण अजूनही डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर, सरकारी अधिकारी नवरा मिळविण्याचा हव्यास तेवढाच आहे. याच प्रतिष्ठेच्या नादात अनेक स्त्रिया फसतात, आणि स्वत:चे नुकसान करून घेतात.
हे सगळे सांगायचे कारण असे, जवळपास लखोबा लोखंडेच्याच स्टाईलने २० वर्षात १८ जणींशी घरोबा थाटणारा एका वल्लीला नुकतीच ओरिसा राज्यातील पोलिसांनी अटक केली. अवघ्या ५ फुट २ इंच उंचीचा हा माणूस स्वत:ला डॉक्टर किंवा प्रोफेसर म्हणवून घेत असला तरी प्रत्यक्षात लॅब टेक्निशियनची परिक्षा पास झालेला आहे.
याच्या मोबाईलमध्ये मॅडम दिल्ली, मॅडम आसाम, मॅडम युपी या नंबरने सेव्ह केले गेलेले नंबर प्रत्यक्षात त्याने त्या त्या ठिकाणी फसविलेल्या महिलांचे आहेत, ज्यांच्याशी त्याने लग्न केले, व नंतर त्यांना लुबाडून पळाला.
आज ६७ वर्षाचा असलेला हा माणसाचे लग्न जुळविण्याच्या वेबसाईटवर ५१ वर्षाचा डॉक्टर, प्रोफेसर, वकील, सरकारी अधिकारी म्हणून प्रोफाईल्स आहेत. त्याचे लक्ष्य हे ४० ते ५० वयाच्या सधन, घटस्फोटीत महिला असत.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे या माणसाने पहिले लग्न १९७८ मध्ये केले. या पहिल्या लग्नापासून त्याला तीन मुले झाली. त्यातील दोन डॉक्टर व एक डेंटिस्ट आहे.
या लॅब टेक्निशियन उर्फ डॉक्टर उर्फ प्राध्यापक महाशयांचे खरे नाव आहे बिहू प्रकाश स्वान. १९७८ मध्ये पहिले लग्न केलेल्या बिहूने नंतर घर सोडून भुवनेश्वर गाठले. तिथे तो स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेत होता. ( हे अगदी देवमाणुस स्टाईल झाले ) तिथे त्याने २००२ मध्ये एका डॉक्टर महिलेशीच लग्न केले.
२००२ पासून मार्च २०२१ मध्ये त्याच्यावर त्याच्यावर संशय येईपर्यंत त्याचे जवळपास २७ महिलांशी लग्न करून त्यांना फसविल्याचा संशय आहे. मार्च २०२१ मध्ये ज्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली, त्यावेळी तो आणखी दोघीजणींशी सूत जुळविण्याच्या प्रयत्नात होता.
त्याच्यावर संशय येण्याचे कारण म्हणजे, त्याच्या त्यावेळच्या बायकोला त्याच्यावर संशय आला. आपल्या नवऱ्याने याअगोदर सातजणींशी फेरे घेतलेले आहेत, हे तिच्या लक्षात आले. ही बाई इतरजणींपेक्षा खुपच हुशार होती. तिने त्याच्या मोबाईलमधून या सातजणींचे कॉन्टक्ट मिळविले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या नवऱ्याच्या उद्योगांची माहिती घेतली.
संजय सत्पार्थी या पोलिस अधिकाऱ्याकडे ही केस तपासासाठी आली. त्यानंतर हळूहळू या बिघू स्वानचे कारनामे पोलिसांपुढे उघड होऊ लागले. हा माणूस एकाचवेळी वेगवेगळ्या नावाने वावरत असे. लग्न जुळविणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईटवर त्याची प्रत्येक ठिकाणी वेगळी ओळख असायची.
या वेबसाईटच्या माध्यमातून प्रतिष्ठा आणी श्रीमंतीचे प्रदर्शन करून तो सधन, घटस्फोटीत महिलांशी संपर्क करत असे. त्यांच्याशी रितसर लग्न करून काही काळ त्यांच्याबरोबर सुखाचा संसार करत असे. त्यानंतर वेगवेगळ्या कारणाने त्यांच्याकडील पैसे, दागिने मागून घेत असे. त्यानंतर त्यांना टाकून पळून जात असे.
या सगळ्या प्रकारात त्याने १३ बॅंकांनाही जवळपास १ कोटीचा गंडा घातला आहे. त्याच्यापाशी १२८ बोगस क्रेडीट कार्ड सापडली आहे. मेडिकल लॅबची चेनही तो चालवत होता, जेथील डॉक्टर आणि बाकीच्या स्टाफला कित्येक महिने पगार मिळालेला नव्हता.
आता हा बिघू स्वान तुरुंगात आहे. परंतू अजूनही त्याने फसविलेल्या सगळ्या महिलांना पोलिस शोधू शकलेले नाहीत.
‘ तो मी नव्हेच ‘ सारखा आणखी एक लखोबा लोखंडे गजाआड गेला असला, तरी ही प्रवृत्ती काही संपलेली नाही. त्यामुळे अनेक अनेक देवमाणूस लखोबा लोखंडे आजही आपले काम करत असतील.