महान्यूज लाईव्ह विशेष
तुम्हाला गुढकथा वाचायला आवडतात का ? या जगात असणाऱ्या गुढ, रहस्यमयी शक्तीवर तुमचा विश्वास आहे ? तुमचा विश्वास असो की नसो, यापुढची गोष्ट तुम्हाला एका रहस्यमयी जगात घेऊन जाणार आहे. या रहस्याचे गुढ उलगडण्याची इच्छादेखील या देशातील तपास यंत्रणाना होत नाही. कोणतीतरी गुढ आणि आध्यात्मिक शक्ती त्यांचेही हात बांधून ठेवते आहे.
थांबा, त्या रहस्यमयी जगात जाण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आजुबाजूच्या जगाला जाणून घ्यावे लागले. समजा तुमचे आजचे उत्पत्न वर्षाला १५ लाख आहे, ते अचानक दीड कोटी होऊ शकते, आणि त्यानंतरच्या काही वर्षात ते पाच कोटीवर पोचू शकते. असे घडावे असे तु्म्हाला कितीही वाटत असले तर ते कोणा गुढ, आध्यात्मिक शक्तीच्या कृपाशिर्वादाशिवाय शक्य नाही. आणि अशी आध्यात्मिक शक्ती भारतात नाही तर आणखी कुठे असणार .
भारत विश्वगुरू होणार आहे, असे आपण नेहमी ऐकत असतो. भारतात आजरोजी असणारे लाखो आध्यात्मिक गुरु पाहता अध्यात्मिक बळाच्या जोरावर आपण जगाला ज्ञान शिकवू शकू याबद्दल तुमच्या मनात काहीच शंका असता कामा नये. अर्थातच तुम्हाला याचा पुरावा हवा असणार, होय ना. पण आहे, पुरावाही आहे. नुकताच याचा एक पुरावा हाती आला आहे. या शक्तीची जाणीव नसणाऱ्या नास्तिकांचा यावर विश्वास बसला नाही, तरी पुरावे असे जबरदस्त आहेत, की विश्वास ठेवावाच लागेल.
आता मुळ गोष्टीकडे येऊ. भारतातील सगळ्या अर्थकारणाचे नेतृ्त्व करणारी एक संस्था जवळपास ३ वर्षे याच आध्यात्मिक शक्तीव्दारे चालविली जात होती. ही आध्यामिक शक्ती ईमेलव्दारे या संस्थेच्या प्रमुखांना आदेश देत होती. संस्थेचे प्रमुख केवळ या आदेशांचे पालन करीत होते. आध्यात्मिक शक्ती म्हणण्याचे कारण म्हणजे गेली पाच सहा वर्षे तपास करूनही तपास यंत्रणांना यामागे शरिररुपाने असलेल्या व्यक्तीची ओळख पटवता आलेली नाही. यापेक्षा वेगळा पुरावा काय हवा.
एनएसई म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात राष्ट्रीय शेअर बाजार . या संस्थेची ताकद अगोदर समजावून घ्या. हा जगातील चौथ्या क्रमांकावर असलेला शेअर बाजार आहे. १९९२ मध्ये स्थापन झालेला हा अत्याधूनिक शेअर्सची खरेदी विक्री करणारा बाजार आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये या बाजारातील भांडवलाचे एकुण मुल्य ३०४ अब्ज डॉलर होते, ते जगातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या शेअर बाजारात दहाव्या क्रमांकाचे होते. ही माहिती सांगितली या आर्थिक संस्थेची ताकद समजण्यासाठी. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या परंतू दररोजच्या शेअर्सच्या उतारचढावात कुणाला श्रीमंत तर कुणाला गरीब बनविणाऱ्या या संस्थेच्या मुख्य कार्यकारी असणारी एक उच्च विद्याविभूषित महिला एका हिमालयात राहणाऱ्या गुरुंच्या निर्देशानूसार जवळपास ३ वर्षे एनएसईचा कारभार हाकत होती. या महिलेला या पदावरून पायउतार होऊनही आता सहा वर्षे झाली. पण तपास यंत्रणांना अजून या गुरुचे साधे नखही दिसलेले नाही. आध्यात्मिक शक्तीचा याहून मोठा पुरावा काय असू शकतो.
चित्रा रामकृष्णा हे या महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नाव. चित्रा २०१३ मध्ये त्या या पदावर आल्या. या पदावर पोचणे हे येरागबाळ्याचे काम नाही. इथे अत्यंत बुद्धीमान असलेल्या व्यक्तीच येऊ शकतात. पण चित्रा रामकृष्ण केवळ बुद्धिमानच नाही तर आध्यात्मिक शक्तीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालीदेखील होत्या. त्यामुळे त्यांनी एनएसईमध्ये कुणाला कामाला ठेवायचे आणि कुणाला नाही याचे निर्णय या गुढ शक्तीच्या आदेशानूसार घेण्यास सुरुवात केली. आनंद सुब्रमण्यम नावाच्या एका व्यक्तीला त्यांनी या गुढ शक्तीच्या आदेशानूसार कामावर घेतले. आधीच्या कंपनीत १५ लाख रुपये वार्षिक पगार असलेल्या या व्यक्तीला एनएसईमध्ये घेताना वार्षिक १.६ कोटी रुपये वार्षिक पगाराचे पॅकेज देण्यात आले. गुढ शक्तीच्या प्रभावाने हा पगारही वाढत गेला. ज्यावेळी सुब्रम्हण्यम एनएसईतून बाहेर पडले, त्यावेळी त्यांना ४.२ कोटी वार्षिक पॅकेज होते.
आध्यात्मिक ताकदीने किती मोठा उद्धार होऊ शकतो, याचे यापेक्षा वेगळे उदाहरण ते कोणते. पण थांबा, ही गुढकथा अजूनही पुढे आहे. आनंद सुब्रम्हण्यम यांना चित्रा यांनी प्रथम सल्लागार म्हणून घेतले. त्यानंतर त्यांना ग्रुप ऑपरेटींग ऑफीसर केले गेले. हिमालयातील या आध्यात्मिक शक्तीने वेळोवेळी दिलेल्या आदेशानूसार हे केले गेले. हे आदेश कसे येत असत. त्यासाठी मात्र ईमेलचे भौतिक साधन वापरले जाई. चित्रा दररोज या आध्यात्मिक शक्तीला ईमेल पाठवत असत. या ईमेलमध्ये एनएसईसंदर्भातील संवेदनशील माहिती असे. या मेलला येणाऱ्या उत्तराप्रमाणे चित्रा निर्णय घेत असत. या शक्तीच्या प्रभावाने या शेअर बाजारातील काही ट्रेडर्सला अनेक गोष्टी अगोदरच कळत, त्यामुळे त्यांना हजारो कोटींचा फायदा होत असे.
पण नास्तिकांना या गोष्टी कशा पटणार. त्यांनी तक्रारी करायला सुरुवात केली. या वाढत्या नास्तिकतेमुळे चित्रा यांना २०१६ साली राजीनामा द्यावा लागला. अर्थातच आनंद सुब्रम्हण्यम यांनादेखील त्यापाठोपाठ पद सोडावे लागले.
पण या प्रकरणाचे गुढ अजून संपलेले नाही. २०१६ पासून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. परंतू चौकशी करणारी सेबीची यंत्रणाही आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावाखाली असल्याचे दिसते आहे. कारण या प्रकरणात कुणालाच अजून शिक्षा झालेली दिसत नाहीये. सेबीने चित्रा रामकृष्णा यांना केवळ ३ कोटीचा दंड करून सोडून दिले आहे, ज्यांना त्यांच्या कार्यकाळात केवळ पगारापोटी ४४ कोटी रुपये मिळालेले आहेत.
चित्रांनी त्यांच्या चौकशीत हिमालयातील गुरुंच्या आदेशानूसार त्या सर्व निर्णय घेत होत्या, हे कबुल केले आहे. हे गुरु त्यांना २० वर्षापूर्वी गंगाकिनारी भेटले होते. तेव्हापासू त्या या गुरुंच्या आदेशाप्रमाणे वागत होत्या. या गुरुंना माहिती देण्यात आपण काही गुन्हा केला आहे, असे चित्रा यांना वाटत नाही. हे गुरु संसारचक्राच्या पलिकडे असल्याने यांना सगळी माहिती देण्यात काहीच गैर नाही, असे चित्रांचे म्हणणे आहे.
चित्रा आणि हे हिमालयीन गुरुंचे सगळे ईमेल सेबीच्या चौकशी पथकाच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये या आध्यात्मिक शक्तीचा आविष्कार दिसतो आहे. या गुरुंनी केलेल्या एका ईमेलमध्ये चित्रा यांना बॅग भरुन ठेव, आपल्या सेशेल्स बेटावर जायचे आहे, असे कळविले आहे. त्याप्रमाणे चित्रा आपल्या गुरुंबरोबर सेशेल्सला गेल्या होत्या की नाही, हे मात्र सेबीचे उघड केलेले नाही.
या आध्यात्मिक गुरुंचा उल्लेख चित्रा करत असल्या तरी चित्रा सोडून कोणालाही हे गुरु प्रत्यक्षात कधी दिसल्याचा पुरावा नाही. हिमालयात ते नेमके कोठे राहतात हेदेखील चित्रा सांगू शकल्या नाहीत. ईमेल करणारा गुरु इंटरनेटची केबल जिथे असेल तिथेच असू शकतो, असे आपण सर्वसामान्य म्हणू शकतो. पण आध्यात्मिक शक्तीला अशा केबल असलेल्या इंटरनेटची गरजच काय, त्यांचे इंटरनेट वेगळेच असू शकते.
सेबीची यंत्रणेलाही या गुरुंचा शोध घ्यावा असे वाटताना दिसत नाही. नाहीतर ईमेलचा पुरावा असताना हे ईमेल कोणत्या कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपवरून आले, हे शोधणे फारसे अवघड नाही. पण पु्न्हा या गुढ शक्तीचा प्रभाव दिसतो. सेबीच्या चौकशी पथकाला हे शोधण्यातच रस नाही असे दिसते. त्यामुळे यासंदर्भात त्यांनी कोणत्याही पोलिसी तपास यंत्रणेची मदत घेण्याचे आजवर टाळले आहे.
२०१३ ते २०१६ या काळात घडलेल्या या गुढ कथेचे रहस्य अजून तसेच आहे. २०२२ आल्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. चित्रांच्या घरावर काही दिवसांपूर्वी आयकर खात्याने छापेही टाकले आहेत.
पण ३ वर्षे एनएसई चालविणारा हा आध्यात्मिक गुरु कोण हे अजूनही कळू शकलेले नाही. भारतातील सगळ्या प्रसारमाध्यमांवरही जणू या आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव आहे, त्यामुळे या विषयाची चर्चा कोणत्याही पेपरमध्ये, न्युज चॅनेलवर किंवा सोशल मिडियात होताना दिसत नाही.
काही नास्तिक हळू आवाजात असेही म्हणतात, की प्रत्यक्षात आध्यात्मिक गुरु असा कोणीच नाही. आनंद सुब्रम्हण्यम हाच हाच यातला सूत्रधार आहे, ज्याला चित्राने आध्यात्मिक गुरु म्हणून उभा केलेला आहे.
खरे काय ते आता सर्व चराचरात व्यापून राहिलेल्या त्या अमूर्त शक्तीलाच माहिती.
हजारो लोकांना शेकडो कोटींचा चुना या सगळ्या प्रकारात लागला. पण तु्म्हाला यामध्ये गुढ आणि रहस्यमय कथेचा फिल आला की नाही ? माझा तुम्हाला सल्ला असा आहे, तुमचे कोटी कोटी कल्याण करून घ्यायचे असेल तर बाकी काही करण्यापेक्षा असा एखादा गुरु शोधा.
भारताला विश्वगुरु होण्यापासून मग कोण रोखू शकेल.