साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त!
दौंड : महान्युज लाईव्ह
बारामती तालुक्यातील दंडवाडी ग्रामपंचायतची पाटस हद्दीतुन हनुमान पाणीपुरवठा योजना अंतर्गत गेलेली लोखंडी पाईप चे साहित्य एका छोटा टेम्पोत चोरी करून जाणारी टोळी पाटस पोलीसांनी जेरबंद केली आहे.
मोसिम रफिक भाई तांबोळी (रा. पाटस), सचिन प्रकाश चव्हाण, पिंटू संभाजी शितोळे, शुभम लक्ष्मण खंडाळे, अमोल बाळु चव्हाण, अक्षय ज्ञानदेव चव्हाण (सर्व रा. कुसेगाव ता.दौंड, जि.पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चोरांची नावे असून दोन चोरांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून चार जण पसार झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस (ठोंबरे वस्ती, लोखंडी पुल ) ते दंडवाडी ( तालुका बारामती ) येथील हनुमान पाणीपुरवठा योजना अंतर्गत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी 10 इंच लोखंडी पाइप लाइनने पाणीपुरवठा केला जातो, सध्या ही पाणी पुरवठा पाईप लाईन बंद आहे.
19 फेब्रुवारी रोजी पाटस हद्दीतुन लोखंडी वाय सॉकेट स्प्रिंग व इतर साहित्य चोरी करून टेम्पोत कुसेगाव येथील पोईच्या घाटाजवळ चोरून नेताना ग्रामस्थांनी पकडला. यावेळी दोन चोरांना पकडले, तर इतर चार जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
याबाबत पाटस पोलीसांना माहिती मिळताच पाटस पोलीसांनी घटना स्थळी धाव घेत साडेचार लाखांचा मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले. याबाबत दंडवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा हनुमंत चांदगुडे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने सहा जणांनावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार, पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सागर चव्हाण पुढील तपास करीत आहेत.