सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील एका जाहीर सभेत बोलताना महिनाभरात अनेक करामती दिसतील, अनेक जण आपल्या स्टेजवर दिसतील असे भरणे म्हणाले आणि इंदापूर तालुक्यात नव्याने पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.
या महिनाभरात महत्त्वाच्या राजकीय असलेल्या व्यक्ती ज्या राष्ट्रवादी विरोधी विचाराच्या आहेत, त्यापैकी महत्वाचे बडे नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे खुद्द भरणे यांनीच संकेत दिले आहेत. त्यामुळे हा नेता कोण याची चर्चा सध्या सुरू आहे. अर्थात त्यामागे अनेक कारणे आहेत.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची वीस वर्षांची अनभिषिक्त सत्ता संपली. गेल्या सात वर्षात इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांची सत्ता नाही. मात्र तरीदेखील गेल्या सात वर्षात हर्षवर्धन पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील वगळता भाजपच्या गटातील महत्त्वाचा नेता पक्ष सोडून गेलेला नाही. एकही महत्त्वाचा नेता अथवा कार्यकर्ता भाजप सोडून गेला नसल्याने भाजपचे वजन अद्यापही तसेच आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या गोष्टीची देखील चर्चा सुरू असून अजूनही इंदापूर तालुक्यात भाजपचे पारडे राष्ट्रवादीच्या बरोबरीनेच असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या गोटातून बड्या नेत्यांना बाजूला काढण्यासाठी राष्ट्रवादीने पद्धतशीर पेरणी सुरू केलेली असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
यामध्ये साखर पट्ट्यातील एका महत्त्वाच्या नेत्यासह भाजपच्या हक्काच्या व्होट बँकेचा आधार असलेला एक नेता देखील राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्थात या राजकीय नेत्याचे नाव उघड झालेले नसले, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात हे नेते असल्याचे सांगितले जाते.
मागील विधानसभा निवडणुकीत 3000 मतांवर आलेले दत्तात्रय भरणे यांचे मताधिक्य अजित पवार यांच्या आवाहनानुसार तीस हजारापर्यंत न्यायचे असेल तर भाजपच्या गोटातील महत्त्वाच्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणावे लागणार आहे. अर्थात राष्ट्रवादीमध्ये देखील सध्या सुंदोपसुंदी दिसते. इंदापूरच्या नगरपालिकेची देखील निवडणूक होणार आहे, मात्र इंदापूरच्या नगरपालिकेतही राष्ट्रवादीत आलबेल नाही असेच चित्र राष्ट्रवादीचे गटनेते गजानन गवळी यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यातून दिसून आले आहे.
अर्थात दत्तात्रय भरणे यांनी निवडणुकीतील मतदानातून धडा शिकून थेट जनसंपर्क तळागाळात वाढवला आणि थेट लोकांमध्ये पोचून राष्ट्रवादी आणि स्वतःचे राजकीय बळ वाढवण्यावर भर दिला आहे, तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील देखील सध्या लोकसंपर्क ठेवून आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर आपला एकही नेता राष्ट्रवादी मध्ये जाऊन घेण्यासाठी हर्षवर्धन पाटील यशस्वी होतात की, दत्तात्रय भरणे हे भाजप व भाजपच्या पोटात असलेल्या नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.