बारामती : महान्यूज लाईव्ह
सत्ता असो वा नसो, बारामती नेहमीच राज्याच्या व देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. आता पुन्हा एकदा मोदी सरकार विरोधात बारामती देशाच्या केंद्रस्थानी आली आहे. कालच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी खुद्द स्वतः याची माहिती दिली. देशभरातील भाजप शासित वगळून इतर राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अन्य राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचे एकत्र संमेलन बारामतीत भरवले जाणार असल्याची माहिती दिली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. चंद्रशेखर राव यांनी काल मुंबई दौरा करून देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. ज्यावेळी देशांमध्ये पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत, दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच के. सी. चंद्रशेखर राव यांनी राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन देशाच्या राजकारणात नव्याने एकत्र येण्याचे संकेत दिले.
देशात सुडाचे राजकारण सुरू असून सध्याची राजकीय परिस्थिती विचित्र आहे या परिस्थितीतून देश बाहेर काढण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल अशी आखणी करत त्यांनी काल श्री ठाकरे व श्री पवार यांच्याशी चर्चा केली या चर्चे नंतर सिल्वर येथील पत्रकार परिषदेदरम्यान किसी चंद्रशेखर राव यांनी देशभरातील सर्व विरोधकांना भेटणार असून त्यानंतर बारामतीत विरोधकांचे एकत्र संमेलन आयोजित करणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे येत्या काळात बारामतीत देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे बडे बडे नेते येणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले असून आता बारामती देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे.