राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील यवत येथे यवत पोलीस स्टेशन पासून फक्त अर्धा किमी अंतरावर पिंपळाच्या वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आणि पुणे सोलापूर महामार्गालगत दिवस- रात्र जेसीबी मशिनच्या साह्याने शेत जमिनीतून खुलेआम बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे संबंधित वाळू माफियांच्या कमरेला पिस्तूल लावून देखरेखीखाली हा वाळू उपसा सुरू आहे.
महसूल आणि पोलिस प्रशासनाला विचारून आम्ही वाळू उपसा करत असल्याचे संबंधित वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींकडून सांगण्यात येते. एका माजी पंचायत समिती सदस्याचा वरदहस्त असल्याने आजुबाजुच्या शेतकऱ्यांना त्रास सहन होऊनही चिडीचूप राहावे लागते.
मागील पंधरा ते वीस दिवसापासून दौंड तालुक्यातील यवत येथील पुणे-सोलापुर महामार्गालगत व पिंपळाचीवाडीकडे जाणाऱ्या रोडवर सार्वजनिक ओढ्यालगत दिवस-रात्र जेसीबी मशिनच्या साह्याने वाळू उत्खनन सुरू आहे.
चाळणी लावलेल्या ट्रॅक्टरच्या साह्याने मातीमिश्रीत वाळू चाळून शेतामध्ये वाळुचा ठिकठिकाणी साठा केला आहे. पुणे व आसपासच्या परिसरातील वाळू वाहतूक करणारे ट्रक मध्ये ही वाळू ची विक्री केली जाते. हा खुला व्यवसाय पुणे महामार्गालगत सुरू आहे, मात्र याची खबर महसूल विभागाला नाही आणि पोलीस प्रशासनालाही नाही हे मात्र नवलच आहे.
पोलीस स्टेशनपासून केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर हा वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपशामुळे पिंपळाचीवाडी कडे जाणाऱ्या दुचाकी आणि वाहनचालकांना व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, मात्र संबंधित वाळू उपसा करणारे राजकीय पक्ष कार्यकर्ते असल्याने त्रास सहन करावा लागूनही गप्प रहावे लागत आहे.
संबंधित वाळू उपसा करणाऱ्यांच्या कमरेला पिस्तूल असल्याने पोलीस स्टेशनला किंवा महसूल विभागाला तक्रार करण्यास सर्वसामान्य शेतकरी घाबरत आहेत. यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि तहसीलदार संजय पाटील यांनी याबाबत जातीने लक्ष घालून हा बेकायदा वाळू उपसा त्वरित बंद करून संबधित वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या भागातील शेतकरी करू लागले आहेत.