शिरूर : महान्यूज लाईव्ह
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील वीचीज फाऊंडेशनने ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली.
शिवजयंती निमित्ताने संत आणि शिवरायांचे विचार जनमानसात पोहचविण्याचे काम श्री संत सेवा संघाच्या माध्यमातून कार्य करणारे शिवव्याख्याते मंगेश पोपटराव पडवळ यांनी केले. त्यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे सलग दहा दिवस शिवव्याख्यान दिले.
स्वातंत्र्य म्हणजे काय?, पारतंत्र्याचा अस्त, शौर्य, पराक्रम, स्वराज्याचे शूरवीर मावळे, बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या प्रसंगातून प्रसंगावधान हे विषय ऐकताना शिवभक्तांसमोर प्रत्यक्ष प्रसंग उभा केला. विचारांची, ज्ञानाची, संस्काराची व स्वाभिमानाची शिवजयंती साजरी करताना या अनोख्या उपक्रमास शिवभक्तांनी चांगला प्रतिसाद दिला.
वीचीज फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रांजली बोरुडे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, नेतृत्वगुण, उत्कृष्ट नियोजन आणि त्यातून उभा राहिलेले हे अखंड स्वराज्य आजच्या पिढीने अभ्यासणे गरजेचे आहे म्हणून शिवजयंती विचारांची, शिवजयंती ज्ञानाची, शिवजयंती संस्काराची हा उपक्रम घेऊन जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी व्याख्यानात स्पष्ट केले.