‘प्रहार’च्या पाठपुराव्यामुळे भोंगवलीतील प्रकरण उघडकीस
माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २० – भोर तालुक्यातील भोंगवली गावच्या हद्दीतील देवस्थानच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून राजगड पोलिसांनी फसवणूक व अपहार प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सात सदस्य यांच्यासह खरेदी – विक्री करणाऱ्या १३ जणांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते यांनी ही बाब उघडकीस आणली.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; तत्कालीन सरपंच नीलम संदीप उल्हाळकर, उपसरपंच लिला उत्तम बाठे, तत्कालीन ग्रामसेवक राहुल धोंडीबा शेलार, सदस्य भगवान एकनाथ भांडे, जीवन हनुमंत निगडे, राजेंद्र विश्वास खोमणे, गणेश दत्तात्रय सुर्वे, मनीषा संतोष शेडगे, इंदुबाई संपत लंके, चांदणी शिवाजी लंके तसेच विक्री करणारा संतोष अर्जुन नलावडे, खरेदी करणारे दापंत्य नीता दीपक चव्हाण, दीपक गुलचंद चव्हाण सर्व रा. भोंगवली, ( ता. भोर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून ही घटना दि. १८ फेब्रुवारी २०१९ ते ९ जून २०२० दरम्यान घडली आहे.
भोंगवली येथील स. नं. ४३२ या जमिनीची श्री. लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, वहिवाट अशी ग्रामपंचायतींच्या रेकॉर्डला नोंद आहे. आरोपींनी या जागेची बनावट कागदपत्रे व खोटे दाखले तयार केले व या जमिनीची विक्री संतोष नदीक चव्हाण यांना केली. हे उघडकीस आल्यानंतर रेकॉर्डला असलेली कागदपत्रे व जमिनीचा व्यवहार करताना सादर केलेली कागदपत्रे जुळत नसल्याने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ग्रामसेवक जकाप्पा बिराजदार रा. शिरवळ ( ता. खंडाळा) यांनी फिर्याद दिली असून राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ करत आहे.
नितीन खामगळ, सहायक पोलीस निरीक्षक : भोंगवली येथील जमीन विक्री प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून कागदपत्राची पडताळणी करून यातील आरोपींना अटक करण्याची तजवीज होईल.
संतोष मोहिते यांच्या ‘प्रहार’ने प्रकरण उघडकीस आणले
प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुक्याचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास ही चुकीची बाब कागदपत्रे पुराव्यानिशी सादर केली. याची तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेतल्याने फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.