प्रदीप जगदाळे : महान्यूज लाईव्ह
काटेवाडीच्या दिशा जाधव या विद्यार्थिनीचा आज वाढदिवस आहे.. शारदानगर येथे होम सायन्स चे धडे घेता घेता बारामतीच्या ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टकडून मिळणारे धाडसाचे व स्वतःहून पुढे येण्याचे, स्वयंसिद्ध होण्याचे संस्कार तिने आपल्या अंगी बाणवले आहेत. त्यातूनच जेव्हा वडिलांना कोरोना झाला आणि त्यांना दवाखान्यात दाखल केले, तेव्हा तिने शेतीची सारी धुरा अंगावर घेतली.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महा न्यूज लाईव्ह फेसबुक वर पाहू शकता..
https://www.facebook.com/mahaanews.live/videos/327421802640749/
द्राक्षबाग काढणीच्या टप्प्यात आहे अशा परिस्थितीत ढगाळ वातावरण येताच तिने कंबर कसली आणि सर्व प्रकारचे खताचे डोस आणि औषधांच्या मात्रा तिने स्वतः दिल्या. बाप कोरोनाशी झगडत असताना पोरीने निसर्गाशी झगडण्यासाठी उचललेले शिवधनुष्य बारामतीसह इंदापूर तालुक्यातील दिलीप जाधव यांच्या शेतकरी मित्रांना आदर्शवत वाटले.
काटेवाडी येथील द्राक्ष उत्पादक दिलीप जाधव हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सध्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ते यशश्री हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचार घेत आहेत. घरातील कर्ता माणूस अंथरूणाला खिळून असेल, तर अनेक समस्या उभ्या राहतात. परंतु काटेवाडीतील या जाधवांच्या लेकीने कंबर कसली आणि आपल्या वडिलांचे काम पुढे नेण्याचा निर्णय घेतला.
त्याला कारणही तसेच होते. द्राक्ष बागेमध्ये द्राक्षाचा माल लगडलेला आहे. बंगलोर पर्पल या जातीच्या द्राक्षबागेला अति थंडी सहन होत नाही अशावेळी त्यावर ती अन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून अगदी वेळेत औषधाच्या फवारण्या कराव्या लागतात. सध्या थंडीच्या लाटेमुळे द्राक्ष बागेत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
मात्र एकीकडे वडील दवाखान्यात उपचार घेत आहेत आणि दुसरीकडे द्राक्षबाग आता शेवटच्या टप्प्यात आहे, अशा परिस्थितीत काय करायचे? हा प्रश्न जाधव यांच्या कुटुंबापुढे उभा राहताच, होम सायन्स म्हणजे फक्त घरातच लुडबुड करावी असे नाही हे समजून घेत दिशाने थेट ट्रॅक्टरचे स्टेरिंग हातात घेतले. खताचा, औषधाचा डोस वेगवेगळ्या टाकीमध्ये भरला आणि थेट द्राक्ष बागेकडे पोहोचली आणि तिने द्राक्ष बागेची फवारणी करण्यास सुरुवात केली.
तब्बल सहा एकर क्षेत्रात तिने ही फवारणी केली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डोसही दिले व वडिलांना धीर देत तुम्ही दवाखान्यात असेपर्यंत द्राक्षबागेचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही आणि त्यातील व्यवस्थापनात कोणताही खंड पडणार नाही याचा तिने विश्वास दिला. या तिच्या कृतीचे सध्या इंदापूर व बारामती द्राक्ष उत्पादकांमध्ये कौतुक केले जात आहे.