महान्यूज लाईव्ह टीम
बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायतीचा नवनिर्वाचित नगरसेवकाचा अंगावरचा गुलाल अजून निघाला नाही, तोच त्याच्यावर चंदन चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
केज नगरपंचायतीचे निकाल नुकतेच लागले. विजयी उमेदवारांकडून विजयाचा जल्लोष आजही सुरूच आहे. मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या आनंदावर एका बातमीने विरजण घातले आहे.
राष्ट्रवादी नवनिर्वाचित नगरसेवक बाळासाहेब जाधव याच्यासह तीन जणांवर अंबेजोगाई पोलिस ठाण्यात चंदन तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या बाळासाहेब जाधवाचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतचा फोटो सध्या सोशल मिडियावर बीड जिल्ह्यात सगळीकडे फिरतो आहे.
बाळासाहेब दत्तात्रय जाधव हा त्याच्या साथीदारांसह अंबेजोगाई तालुक्यातील वाघाळा शिवारात अंबा साखर कारखान्याजवळील देवकर कुंडकर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये चंदनाच्या झाडाची चोरी करून झाड आणि झाडाचे खोड तपासून गाभा काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड घालून २७ किलो चंदनाचा गाभा पकडला. याची किंमत ६७ हजार ५०० असून या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.