किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
सणसर येथे आज पहाटे एक ते तीनच्या दरम्यान एका ठिकाणी घराची कडी काढून चोरीची घटना घडली. येथील छत्रपती हायस्कूलच्या पाठीमागे दत्तात्रय आडके यांच्या घरी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.
यामध्ये त्यांचे दोन अँड्रॉइड मोबाइल, खिशातील सहाशे रुपये चोरीला गेले. त्याचबरोबर त्यांचे बंधू संभाजी यांच्या घराचे दार उघडून कॉटखाली असलेली पत्र्याची पेटी घरातून बाहेर नेऊन सणसरच्या स्मशानभूमीच्या जवळ ही पेटी उचकटून पेटीतील अंदाजे एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, लहान मुलांच्या चांदीच्या बांगड्या व रोख दहा हजार रुपये चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घर कसेतरी पुन्हा सावरले होते.. मात्र !
दत्तात्रय आडके यांचे घर गेल्यावर्षी अतिवृष्टीने सणसरच्या ओढ्याला पूर येऊन पूर्णपणे वाहून गेले होते अगदी घरातील फरशीही ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. त्यावर मोलमजुरी करत त्यांनी पुन्हा आपला संसार नव्याने उभा केला होता. आज परत त्यांच्या घरातील मुलीच्या बाळंतपणासाठी बचत गटाचे पैसे उचलले होते.त्यातीलच दहा हजार रुपये आज चोरट्यांनी चोरून नेल्याने हे कुटुंब अस्वस्थ झाले आहे.
मागील दोन महिन्यापासून मोटारसायकल चोरीच्या घटना ही भवानीनगर परिसरात घडल्या आहेत. मागील महिन्यात मुस्तफा सय्यद यांच्या घराच्या दरवाज्याची कडी तोडून सोन्याचे दागिने चोरी झाले होते. या वाढत्या घटना लक्षात घेता पोलिसांनी जलद तपास करून या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.