माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
भोर तालुक्यातील नसरापूर येथील बाजारपेठेत माती डंपरची दिवसभर वाहतूक आणि बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यावरून अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाला याची कल्पना असूनही दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. ही बाजारपेठ पंचक्रोशीसाठी मध्यवर्ती ठिकाण असून याठिकाणी परिसरातून ग्राहक खरेदीसाठी येत असतात तसेच पर्यटकांचीही वर्दळ असते. मात्र अवजड वाहतूक करणारे माती डंपर आणि बेशिस्त पार्किंगमुळे नसरापूरमध्ये रोजच वाहतूक कोंडी होत आहे.
नसरापूर बाजारपेठ ही भोर आणि वेल्हा तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ समजली जाते. मात्र बाजारपेठ ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागून वसली असल्याने रस्त्याचा मोजकाच भाग वाहतुकीसाठी खुला रहातो. गेल्या अनेक वर्षांपासून येथील काही महाभाग दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर वाढीव बांधकाम केल्याची प्रकरणेही मागील काळात तहसीलदारापर्यंत गेली आहेत. त्यावेळी कठोर कारवाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या झाल्याने यावर कोणतीही कारवाइ न होता ही प्रकरणे राजकीय दबावापोटी दडपण्यात आल्याचेही चर्चा झडत आहे.
नसरापूर बाजारपेठेत कामासाठी येणाऱ्या लोकांबरोबरच अनेक ग्राहक येत असतात. यावेळी अवजड वाहतूक करणारे माती डंपर मुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे विदारक चित्र असून वाहतुकीचा विचार न करता अनेक वाहने कुठेही अस्ताव्यस्त लावली जातात. तसेच अतिक्रमणे वाढल्याने फुटपाथची रचना करण्यात ग्रामपंचायतीला अडचण येत आहे. नसरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आठवडे बाजार दिवशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्की मारून उपाययोजना केल्या जातात. मात्र रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अनेक वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. तसेच इतर छोटी मोठी वाहनेही लावली जात असल्याने एसटी वाहतूक किंवा इतर वाहतुकीला फार मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अनेकवेळा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत .
याबाबत अनेकवेळा प्रवाशी आणि नागरिकांनी स्थानिक प्रशासन यांच्याकडे तक्रारीही करण्यात येतात आहेत. मात्र बघ्याची भूमिका घेऊन यावर कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. निदान आत्ता तरी भविष्यातील होणारे वाद टाळण्यासाठी प्रशासकाकडून या गोष्टीची दखल घेतली जावी व अशा माती डंपरवर आणि बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर स्थानिक प्रशासन आणि राजगड पोलिसांनी ठोस कारवाईस सुरवात व्हावी अशी रास्त अपेक्षा जनसमन्यातून व्यक्त होत आहे.