दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील ओहोळी घेरा केंजळ येथील तब्बल १५ ते २० शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीच्या जागेत कुठलेही भूसंपादन न करताच भोर तालुक्यातील सार्वजनीक बांधकाम विभागाने बेकायदेशीर पणे दगड माती आणी मुरुमाचे उत्खनन केले असल्याची तक्रार ओहोळी गावचे सरपंच संजय वाडकर व
ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना दि.२१ रोजी दिले होते.
याची गंभीर दखल घेऊन तहसीलदारांनी तात्काळ त्या गावचे गाव कामगार तलाठी संजय वडगुळे यांना घटना
स्थळावर पाठवून पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तलाठ्यांनी ६०० मीटर लांब ८ मीटर
रुंद आणि ९ मीटर ऊंची अशा क्षेत्रात झालेल्या दगड
माती आणि मुरुमाच्या उत्खननाची पाहणी केली. अंदाजे १३०० डंपर गौण खनिज उत्खनन झाले असलेचा अहवाल वाईच्या तहसील कार्यालया कडे सुपूर्त केला आहे.
विना परवाना झालेल्या या उत्खननात शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार यांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे ओहोळी ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. याची थोडक्यात माहिती अशी की, वाई तालुक्यात घेराकेंजळ ओहोळी हे शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. या गाव रस्ता फाट्यापासुन रायरेश्वराच्या गडापर्यंत जाण्या येण्यासाठी अरुंद आणि कच्चा रस्ता आहे.
याच रस्त्याचे रुंदीकरणाचे काम भोर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्या साठी ठेकेदाराची नेमणूक करुन रुंदीकरणाचे काम देखील सुरु झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा अंदाजे १५ते २० खाजगी शेतकऱ्यांच्या जमीनी आहेत. त्यांच्या जमीनींचे भूसंपादन न करताच भोर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची संमती न घेताच त्यांच्या जमीनीत अतिक्रमण केले.
जीसीबीच्या साह्याने ९ मीटर ऊंचीचे दगड, मुरुम आणि मातीचे ढिगारे सपाट करुन मनमानी कारभार सुरु केला आहे. वास्तविक पाहता संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरु करण्याआधी शेतकऱ्यांना भुसंपादनाच्या नोटीसा बजावून त्यांना रस्त्यात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला देणे अपेक्षित होते किंवा शेतजमीनीच्या मालकांना बोलावून कल्पना देणे बंधनकारक होते, ते देखील त्यांनी केले नाही.
आपल्या जागेतून रस्त्याचे काम सुरु झाल्याची माहिती मिळताच त्याला विरोध करण्यासाठी ओहोळी गावचे सरपंच संजय वाडकर, रामचंद्र वाडकर, केणबा वाडकर, कोंडीबा वाडकर, दिनकर वाडकर, आनंदा घोलप, नारायण घोलप, लक्ष्मण वाडकर, किसन वाडकर या शेतकऱ्यांनी एकत्रीत येऊन रस्त्याचे काम बंद पाडले .
याची अधीक माहीती घेण्यासाठी सरपंच संजय वाडकर यांनी थेट भोर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने उडवाऊडवीची उत्तरे दिली, त्यामुळे ओहोळी
ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वास्तविक पाहता हा रस्ता वाई तालुक्यात होत असताना वाईच्या तहसील कार्यालयाच्या परवानगीची आवश्यकता होती. मात्र वाईच्या तहसीलदारांना अंधारात ठेऊन ठेकेदाराने सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवून खाजगी शेतकऱ्यांच्या जमीनी लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पण येथील सरपंच संजय वाडकर यांनी येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चंग बांधल्याने त्यांनी थेट शुक्रवार (दि.२१ रोजी) वाईच्या तहसीलदारांना भोर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी कशा लाटल्या याचे एक निवेदन तयार करुन दिले.
या निवेदनाची गंभीर दखल वाईच्या तहसीलदारांनी ठेकेदाराने विना परवाना काय काय उद्योग केलेत याची पाहणी करण्यासाठी तात्काळ ओहोळी गावचे गाव कामगार तलाठी सचिन वडगुळे यांना घटना स्थळावर पाठवून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.