महान्यूज लाईव्ह टीम
आपल्या मतदारासंघात भरणेमामा म्हणून परिचित असलेल्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणेचे हे रुप पाहून उपस्थितांनाही भरून आले. गणेश नगर ( ता. इंदापूर ) येथील राष्ट्रवादी कार्यकर्ते परिमल मस्तुद यांचे दोन दिवसांपूर्वी पुणे – सोलापूर महामार्गावरील डाळज नं. १ च्या हद्दीत अपघाती निधन झाले.
परिमल मस्तूद यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अचानक भावना अनावर होऊन अश्रू ढाळणाऱ्या भरणेमामांना पाहून उपस्थित स्तब्धच झाले.
मस्तूद कुटुंबियांची भेट घेत असताना अचानक परिमल मस्तूद यांचा आठ महिन्याचा मुलगा रांगत भरणेमामांच्या जवळ आला. मामांनी त्याला उचलून मांडीवर घेतले. त्यावेळी त्यांनाही अश्रू अनावर झाले. ते स्वत:ही रडू लागले. हे दृश्य पाहून त्या ठिकाणी एकदम शांतता पसरली. उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यातही पाणी आले. अनेक कणखर निर्णय घेणाऱ्या, राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आपल्या चालींनी नामोहरम करणाऱ्या राज्यमंत्र्यांमधला हळवा माणूस उपस्थितांनाही हलवून गेला.