शिरूर : महान्युज लाईव्ह
रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन रात्र गस्तीवर असताना चोरटयांशी समोरासमोर झालेल्या चकमकीत दोन पोलिस जखमी झाले आहेत तर एक चोरटा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
रमेश भीमा पवार ( वय.३०, रा. लिंगानोर,मिरज, जि.सांगली )असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व अंमलदार पोलिस नाईक राजेंद्र वाघमोडे,पोलिस हवालदार विजय सरजिने,सहायक फौजदार गायकवाड हे रात्र गस्त घालत परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी लक्ष ठेवून होते.
रात्रगस्त घालत असताना रात्री तीनच्या सूमारास रांजणगाव जुना टोलनाका येथे तीन ते चार अनोळखी व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसल्या . यावेळी या पथकातील अंमलदार यांनी जवळ जाऊन झडप घालण्याचा प्रयत्न केला असता यातील चार आरोपींपैकी एकाने पोलिस नाईक राजेंद्र वाघमोडे यांच्या हातावर लोखंडी रॉड मारला. जोरात फटका बसल्याने राजेंद्र वाघमोडे हे जखमी झाले. या दरम्यान पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे यांच्याशीही झटापट केली.पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. यावेळी आरोपीकडे चाकू,कात्री, बॅटरी, रापी, व लोखंडी रॉड मिळून आले. तर उर्वरित आरोपी हे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
दरम्यान या आरोपींनी चाकूचा धाक दाखवून एकाला मारहाण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या प्रमोद चव्हाण याच चोरट्यांनी मारहाण केली होती. त्यांच्याजवळील मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता,आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हा तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, पोलिस नाईक राजेंद्र वाघमोडे, विजय सरजीने,सहायक फौजदार गायकवाड,दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर,संतोष औटी,विजय शिंदे,वैभव मोरे यांनी केली आहे.