सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
वालचंदनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक कवी सुभाष लहु वाघमारे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ इंदापूर तालुक्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
रविवारी (दि.९) बारामती येथे संपन्न झालेल्या बैठकीत अखिल भारतीय साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.जयप्रकाश घुमटकर, राष्ट्रीय उपाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, पुणे जिल्हाध्यक्षा हर्षदा झगडे यांनी हा निर्णय घेतला.
सुभाष वाघमारे हे आनंदनगर (जंक्शन) येथील रहिवासी आहेत. वालचंदनगर व जंक्शन परिसरातील सामाजिक,सांस्कृतिक,साहित्यिक,राजकीय,शैक्षणिक,क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. वालचंदनगरच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे ते संचालक आहेत.या सर्व बाबींची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने त्यांची तालुका उपाध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे.
मराठी भाषेचे संवर्धन करणे,मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी जीव ओतून साहित्यिक, सामाजिक, सास्कृतिक क्षेत्रामध्ये काम करावे असे आवाहन निवडीनंतर पुणे जिल्हाध्यक्षा हर्षदा झगडे यांनी केले आहे.