इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सणसर गावचे माजी उपसरपंच जगदिश निंबाळकर यांचे चार दिवसांपूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले, तर आज (ता.७) पहाटे त्यांचे थोरले बंधू व सणसरचे पोलीस पाटील राजेंद्रसिंह निंबाळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
जगदीश निंबाळकर गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाने त्रस्त होते. त्यांचा आजार बळावत गेला आणि चार दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. तर आज पहाटे राजेंद्रसिंह निंबाळकर यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला. सणसरचे माजी सरपंच, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह निंबाळकर यांचे हे दोन्ही बंधू होते.
सणसरचे पोलीस पाटील राहिलेले राजेंद्रसिंह निंबाळकर हे नामांकित पहिलवान होते. त्यांनी अनंतराव पवार यांच्या स्मरणार्थ अनेकदा कुस्ती मैदाने भरवली. महाराष्ट्रातील दिग्गज पैलवानांना आमंत्रित केले. अनेक नवोदित पैलवानांना प्रोत्साहन दिले. सणसरच्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी दिर्घकाळ योगदान दिले. करारी व्यक्तिमत्त्व असलेले राजेंद्रसिंह निंबाळकर सामाजिक कामातही अग्रेसर होते.
राजेंद्रसिंह निंबाळकर यांनी एखाद्या व्यक्तीला भाजल्यावर फार कमी वेळातच त्वचेची जखम भरून काढण्यासाठी मदतीचा ठरणारा मलम बनवला. ते नेहमी हा मलम तयार ठेवत असत. त्याचा परिसरातील शेकडो जणांना फायदा झाला. शेतीच्या बाबतीतही त्यांनी अनेक प्रयोग केले. द्राक्ष उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न केला, तसेच भाजीपाला पिकांच्या उत्पादनातही त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले होते.