सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर पोलिसांनी गुरुवारी केलेल्या कारवाईत तब्बल 21 लाख रुपयांचा बेकायदा विक्रीस चालवलेला गुटखा पकडला. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी च्या काळात संशयास्पद हालचाली दिसून आल्याने वाहन थांबल्यानंतर पोलिसांना हा अवैध गुटखा दिसून आला.
इंदापूर पोलिसांनी याप्रकरणी गणेश आबासाहेब चव्हाण (वय २५ वर्षे रा. शेटफळ ता. मोहोळ जि. सोलापूर) व गाडीमालक चंद्रकांत क्षीरसागर (रा. बारामती जि. पुणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.
ही घटना इंदापूर – गलांडवाडी नजिकच्या भागातील नाकाबंदी दरम्यान घडली. पोलिसांनी नाकेबंदी केली होती. या नाकेबंदी दरम्यान पोलीस वाहनांची तपासणी करत होते विनापरवाना वाहन चालविणारे तसेच कागदपत्रे असलेली वाहने यांची खातरजमा केली जात असतानाच समोरून वाहन (क्रमांक एम.एच.45 ए.ई.5348) हा टेंम्पो निघाला.
पोलिसांना या टेम्पो मधील हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी टेम्पो थांबवला व तपासणी केली असता, त्यामध्ये विक्रीसाठी चालवलेला अवैध गुटखा पोलिसांना मिळून आला. यामध्ये गुटख्याच्या दोन कंपनीची 40 पोती आणि 25 बॉक्स असा एकूण 21 लाख रुपयांचा गुटखा आढळून आला.
या कारवाईत १५ लाखाचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला असून एकूण 36 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर, फौजदार दाजी देठे, पोलीस नाईक मनोज गायकवाड व पोलीस नाईक निलेश फडणीस यांनी केली.