पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्याची गोष्ट नेहमीच वेगळी असते, मग पुण्याचे ट्रॅफिक पोलिस त्याचा कसे अपवाद ठरणार. पुण्याच्या या ट्रॅफिक पोलिसांचे दोन व्हिडिओ कालपासून सोशल मिडियावर फिरत आहेत.
एक व्हिडिओ पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील असल्याचे सांगण्यात येते. यामध्ये ट्रॅफिक पोलीस एका बसचालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगत आहे. काही वेळाच्या ” प्रेमळ ” संवादानंतर ट्रॅफिक पोलिसाने बसची काचच फोडून टाकल्याचा आवाज येतो आहे, आणि बसचालकही फोनवरून कुणालातरी पोलिसांनी गाडीची काच फोडल्याचे सांगताना दिसतो आहे.
दुसऱ्या प्रसंगातील काही भाग व्हिडिओचा आहे,पण त्या व्हिडिओनंतरही बरेच रामायण घडलेले आहे.
एक महिला पोलिसाने चौकात एक चारचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. ती गाडी थांबली नाही. त्या गाडीचा नंबर घेऊन त्या महिला पोलिसांनी त्यावर ई चलन जारी केले. हे ई चलन मोबाईलवर मिळाल्यावर हा गाडीचालक परत फिरून आला, आणि त्या महिला पोलिसाशी वाद घालू लागला. प्रकरण चौकीपर्यंत गेले. पण त्यावेळी या गाडीचालकाच्या गाडीत ही महिला पोलिस बसली होती, या बहाद्दराने चौकीपाशी गाडी थांबवलीच नाही. चालू गाडीत तो त्या महिला पोलिसाशी वाद घालत राहिला. तुम्हाला ई चलन करण्याचा अधिकारच काय ? आता हे ई चलनाचे पैसे तुम्हीच भरा, अशी त्याची भाषा होती. जवळपास या महिला पोलिसाचे त्याने अपहरणच केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी थांबवून सदर व्यक्तीवर कारवाई केली.
ट्रॅफिक पोलिस चुकीचे वागत असतील पण नागरिकांचेही वर्तन फार कौतुक करणारे नाही. चुका दोन्ही बाजूकडून होत असतात. दोन्ही बाजुंनी त्या सुधारणे गरजेचे आहे, असेच हे एकाच दिवशी घडलेले दोन्ही प्रसंग पाहून वाटते.