इंदापूर : महान्यूज लाईव्ह
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या एफ आर पी व कामकाजाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपावर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी उत्तर दिले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंत दोन लाख 93 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे व दोन लाख 82 हजार 600 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखरेचा दैनंदिन उतारा 9. 96 टक्के इतका आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून 85 लाख युनिट विजेची विक्री झाली आहे.
कारखान्याने ऊस गाळपात व साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. परंतु काही लोक कारखान्याच्या येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारखान्याच्या कामकाजाबाबत चुकीची माहिती पसरवून सभासदांची दिशाभूल करीत आहेत. असे मत व्यक्त केले.
कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की 47 दिवसांनी प्रति टन 2200 रुपये ऍडव्हान्स जाहीर केला. असे आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की कारखान्याने विस्तार वाढ व सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कारखान्याच्या उत्पन्नातूनच परतफेड करावयाचे आहेत. त्यासाठी तरतूद करावी लागते या कर्जाची परतफेड करावयाची असल्याने कारखाना एक रकमी एफ आर पी देऊ शकत नाही. तरीही कारखान्याने एफ आर पी च्या 87% प्रति टन उसाचे पेमेंट केले आहे.
राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार राज्यातील जवळपास सर्व साखर कारखान्यांनी भागाची दर्शनी किंमत वाढविली आहे. काही कारखान्यांनी एक किंवा दोन हप्त्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु श्री छत्रपती कारखान्याने सभासदांच्या अडचणींचा विचार करून वाढीव भागाची रक्कम तीन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
चालू गळीत हंगामात संचालक मंडळाने बारा लाख मेट्रिक टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी कार्यक्षेत्राबरोबरच कमी पडणारा ऊस कार्यक्षेत्राबाहेरून आणून उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. जास्तीचे गाळप झाले तर त्याचा सभासदांनाच फायदा होणार आहे.
साखर व मळी विक्री करण्याचा निर्णय भविष्याचा विचार करूनच घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना आत्ता आरोप करणारे स्वतः सभागृहामध्ये उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी गळीत हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने पैशाची उपलब्धता व्हावी यासाठी साखर व मळीची आगाऊ विक्री करण्यासाठी सूचना मांडली होती.
आज खुद्द तेच कच्ची साखर विक्री करून कारखाना व सभासदांचा काय फायदा झाला असा आरोप करीत आहेत. वास्तविक पाहता हा निर्णय चुकीचा आहे असे ते म्हणत असतील तर त्यांनी त्या वेळीच विरोध करावयास पाहिजे होता.असे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले.
माळेगाव कारखान्याची कच्ची साखर प्रतिक्विंटल 3190 या दराने विक्री केली अशी माहिती दिली जाते परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या दरात दररोज चढ-उतार होत असतो श्री छत्रपती कारखान्याने प्रतिक्विंटल 3100 व 3080 रुपये प्रमाणे साखर विक्री केली असली तरी या साखरेवर पंचवीस कोटी रुपये ॲडव्हान्स घेतलेला आहे व सदरची रक्कम कारखाना दैनंदिन खर्चासाठी बिनव्याजी वापरत आहे.
ही रक्कम घेतल्यामुळे संचालक मंडळाला योग्य आर्थिक नियोजन करता आले. त्यामुळे चालू गळीत हंगामात उसाचे चांगल्या प्रकारे गाळप होत आहे. कारखान्याने पंधरा टक्के व्याजाने कर्ज घेण्यापेक्षा बिनव्याजी पैसे घेतले तर त्यात कारखान्याचे नुकसान काय झाले? कारखान्याने कच्ची साखर विकल्यामुळे बँकेचे प्रत्येक पोत्यावरील जादा व्याज भरावे लागणार नाही. त्यामुळे व्याजात बचत झाल्याने सभासदांचा फायदा झाला आहे.
कच्चा साखरेवर 500 रुपये प्रति क्विंटल ऍडव्हान्स घेतला आहे. त्या साखरेची उचल ( लिफ्टींग ) चालू झाली आहे. लवकरच कच्च्या साखरेचे रॅकही लागणार आहे. त्यामुळे जी कच्ची साखर विक्री केली आहे त्याचीही उचल लवकर होणार आहे असे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले.
कारखाना घेत असलेल्या गेटकेन उसाच्या बाबतीत विरोधक आरोप करतात परंतु कारखाना हा सन 2000 सालापासून गेटकेनचा ऊस घेत आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ज्यावेळी उसाची कमतरता असेल त्यावेळी गेटकेन उस आजपर्यंत आणलेला आहे. कधीकाळी कर्नाटक राज्यातून सुद्धा ऊस आणलेला आहे.
कर्नाटकातून जो ऊस आणला तो कोणाच्या हितासाठी आणला? असा सवाल करत संचालक मंडळ हे सभासदांच्या हितासाठी जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करून सभासदांना चार पैसे अधिकचे कसे देता येतील या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. गेटकेन ऊस घेण्यासाठी प्रतिटन तीनशे पन्नास रुपये इतका खर्च येत नसून तो नियमित वाहतूक खर्चापेक्षा साधारण प्रति टन 45 रुपये इतका ज्यादा आहे व तो यापूर्वी कर्नाटक मधून आणलेल्या उसाचे वाहतूक खर्चापेक्षा निश्चितच कमी आहे. असेही अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले.
यंदा साखरेचा उताराही चांगला मिळत आहे. संचालक मंडळाने चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे यंदाच्या गाळप हंगामात दैनंदिन गाळप व रिकव्हरी मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र काही लोकांनी गेल्या अठरा वर्षात अनेक वेळा कारखान्याच्या कामकाजाबाबत तक्रार अर्ज देऊन हा कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
कारखाना योग्य पद्धतीने चाललेला असून कारखान्याच्या कामकाजाबाबत चुकीचे आरोप करून चांगल्या चाललेल्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा अपप्रवृत्तींना सभासदांनी वेळोवेळी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. असेही अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले.