इथून पुढे असे घडू नये, दिला सुचक इशारा ..!!अडचणीत असाल तर घाबरू नका ! तातडीने ११२ डायल करा… पोलीस निरीक्षक तयुब मुजावर
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक तक्रारी घडत असताना पोलीस पाटलांचे त्या बाबीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याने इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तयुब मुजावर कमालीचे नाराज असल्याचे दिसून आले. पोलीस पाटलांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत मुजावर यांनी शिस्त पाळावी, असे सांगत पोलीस पाटील यांच्या बाबत इथून पुढे खपवून घेणार नसल्याचे संकेत देत पोलीस पाटलांची कानउघडणी केली.
त्याचबरोबर अडचणीत असाल तर नागरिकांनो घाबरू नका ! तातडीने ११२ डायल करा..असे आवाहन मुजावर यांनी नागरिकांना केले आहे. मुजावर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, तुम्ही इंदापूर तालुक्याच्या कोणत्याही गावात अथवा इंदापूर शहरात असाल व तुम्ही अडचणीत असाल तर घाबरू नका !
तातडीने ११२ डायल करा. १० ते १२ मिनिटात पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील.अडचणीतील नागरिकांच्या मदतीसाठी अद्ययावत अशी डायल ११२ सुविधा राज्य पोलीस दलाने इंदापूर तालुक्यात कार्यान्वित केली आहे अशी माहिती मुजावर यांनी दिली.
९ नोव्हेंबर रोजी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे पोलीस क्षेत्रातील प्रमुख पोलीस अधिकारी, बिट अंमलदार, कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या समवेत तक्रार निवारण दिन कार्यक्रम पार पडला.
यावेळी मुजावर यांनी तक्रार दिनाच्या दिवशी काही गावचे पोलीस पाटील उपस्थित राहिले नसल्याच्या कारणावरून नाराजी व्यक्त केली.गाव पातळीवर पोलिस पाटलांची अतिशय महत्त्वाची भूमिका असून तक्रारींचा निपटारा होण्यासाठी त्यांची उपस्थिती महत्वाची आहे.
पोलीस पाटलांनी आपापल्या गावांमध्ये बारकाईने लक्ष देऊन चोऱ्या माऱ्या व काही नवीन गोष्टी घडत असल्यास त्यांची माहिती पोलीस स्टेशनला देणे अतिशय गरजेचे आहे. आपापल्या गावांमध्ये बऱ्याच काही वाईट- चांगल्या गोष्टी तसेच छोट्यामोठ्या तक्रारी च्या घटना घडत असतात.
परंतु त्या पोलीस पाटलांना माहीत नसतात, कारण पोलीस पाटील याकडे बारकाईने लक्ष देताना दिसून येत नाहीत. छोट्या-मोठ्या तक्रारी याबाबत पोलीस पाटील गांभीर्याने लक्ष देत नाहीत, असे सांगत असे पुन्हा घडू नये असा सूचक इशारा ही पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी दिला.
दरम्यान उपस्थित असणाऱ्या पोलीस पाटलांनी गाव पातळीवरील तक्रारी मांडल्या. यावेळी पोलीस निरीक्षक मुजावर यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक गावातील तक्रारी सोडवल्या. नागरीकांनी आपआपसातील वाद सामोपचारांने मिटवून एकोपा टिकवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
आगामी येणाऱ्या निवडणूका बाबत, गावागावांतील बँक, सराफ कट्टा यांच्या सुरक्षाबाबत, महिला व शिक्षण घेत असणाऱ्या मुली विषयी होणारे अपराध व त्या विषयी घ्यावयाची दक्षता, कोविड तसेच गावागावात शांतता व सलोखाबाबत चर्चा करण्यात आली..