महान्यूज टीम
आरोग्य विभागाची गट क व गट ड संवर्गासाठी घेण्यात आलेली परिक्षा रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या दोन्ही परिक्षेत प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तसेच या गैरप्रकारात आरोग्य खात्याचेच कर्मचारी आणि अधिकारी सामील असल्याचे स्पष्ट होत असल्याने आता ही परिक्षाच रद्द करावी अशी मागणी केली जात आहे.
आरोग्य विभागाने खासगी संस्थेमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबवली. त्यावेळी राज्यात केवळ आरोग्य विभागात भरती करत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगत होते. परंतू या भरती प्रक्रियेत सातत्याने तांत्रिक अडचणी आल्याने परिक्षा रद्द करण्याची वेळ आली. अखेरीस २४ ऑक्टोबरला गट क संवर्गातील विविध पदांसाठी, तर गट ड संवर्गातील विविध पदांसाठी ३१ ऑक्टोबरला परिक्षा घेण्यात आली.
यापैकी क संवर्गासाठी ४ लाख ५ हजार १७९ विद्यार्थी तर, ड संवर्गासाठी ४ लाख ६१ हजार ४९७ उमेदवारांनी अर्ज केले होते. या परिक्षेत परिक्षेपुर्वी गोंधळ झालाच, पण परिक्षेच्या दिवशीही प्रश्नपत्रिका समाज माध्यमांवर फिरत असल्याचे स्पष्ट झाले.
या सगळ्या प्रकारामुळे ही परिक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गैरप्रकाराबाबत आम आदमी पक्षाकडून पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दहापेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे.