इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती कारखान्याने प्रतिटनी २२०० रुपयांचा हप्ता जाहीर केल्यानंतर विरोधकांनी संचालक मंडळाला लक्ष्य केले आहे. शेतकरी कृती समितीचे सदस्य विशाल निंबाळकर यांनी कारखान्याच्या अध्यक्ष, कार्यकारी संचालक व संचालकांना एक पत्र दिले असून त्यामध्ये संचालक मंडळाने किमान एक डबा गोडेतेल येईल एवढा तरी हप्ता द्यायचा होता असा उपरोधिक टोला दिला आहे.
विशाल निंबाळकर यांनी कारखान्याकडे एक पत्रक दिले अशून त्यामध्ये त्यांनी संचालक मंडळावर टिका केली आहे. कारखान्याने २०२१-२२ हंगामात गाळपास येणाऱ्या उसासाठी प्रतिटनी २२०० रुपये हप्ता दिला आहे. मात्र ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचे निंबाळकर यांनी म्हटले आहे. कारखान्याच्या परिसरातील इतर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली.
किमान सध्याच्या महागाईचा विचार करता सभासदांना एका टनात किमान एक गोडेतेलाचा डबा घेता येईल असा तरी हप्ता द्यायचा होता असे सांगत एकरकमी एफआरपी देण्यास संचालक मंडळ असमर्थ असेल, तर पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टिका त्यांनी केली आहे.
संचालक मंडळाने सन २०२१-२२ मध्ये हंगामात उत्पादित होणाऱ्या साखरेच्या पोत्यांपैकी ५ लाख पोत्याची हंगाम होण्यापूर्वीच अॅडव्हान्स विक्री संचालक मंडळाने केली आहे. ५०० रुपये प्रतिक्विंटल या अॅडव्हान्सपोटी २५ कोटी व १० कोटी रुपये मळीच्या अगाऊ विक्रीतून कारखान्याला मिळालेले आहेत, तरी देखील कारखाना या कारखान्याचे मालक असलेल्या सभासदांना एकरकमी एफआरपी देऊ शकत नाही हे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.