दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
गेले चार महिन्यापासून कवठे (ता. वाई) येथे एका लाल तोंडाच्या माकडाने गावातील लोकांना हैराण करुन सोडले होते. अनेकांना या माकडाने चावे घेऊन हल्ला केल्याने ग्रामस्थांनी त्याचा धसका घेतला होता. अनेकदा प्रयत्न करुनही त्याला पकडण्यात अपयश येत होते. मात्र काल तीन टिम करुन त्याला जाळ्यात पकडण्यात वनविभागाला यश आले.
लोकांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना इजा करणे या कारणांमुळे गावातील लोकांनी सदर माकडाचा बंदोबस्त करणेबाबत वनविभागास कळविले होते. त्याची दखल घेत वनविभागाने विविध प्रकारे प्रयत्न केले. सातारा येथील प्राणिमित्र कात्रज, पुणे येथील बचाव पथक, RES पुणे येथील पथक यांच्या मदतीने सदर माकडास जेरबंद करण्याचा प्रयत्न केला.
त्यास पकडण्यासाठी व त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी गावातील लोकांशी व ग्रामपंचायतीशी संपर्क साधला. कवठे गावचे पोलीस पाटील श्री. ससाणे यांनी सहकार्य केले. माकडाबाबतची माहिती गोळा करणेसाठी असलेल्या वनकर्मचाऱ्यांना गावातील तरुण अभिषेक मोरे यानेही मदत केली. परंतू ब-याच वेळा अपयश आले.
अखेर ८ डिसेंबर रोजी नव्या जोमाने वाई व भुईज येथील प्राणी मित्र व सर्व वनकर्मचारी अधिकारी सर्वानी मिळून कवठे येथे सर्व साहित्यानिशी माकडाच्या ये-जा असणा-या वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेगवेगळी पथके तयार केली. भुईंज येथील शंकर यादव व त्यांचे सहकारी सौरभ बनसोडे, हर्षवर्धन मंगवडे , गणेश जाधव, आकाश चव्हाण यांनी सदर माकडाला एका घरात जाण्यास हुसकवले व बंदिस्त केले. या ठिकाणी वनपाल संदीप पवार, वनरक्षक वैभव शिंदे, रामेश्वर भोपळे व वाई येथील अंकुश पवार , अजिज शेख
सौरभ कासार, जनार्दन खरे , रोहित शेवते तेथे पोहचले.
सर्वानी सदर घरामध्ये प्रवेश करुन त्या
माकडास प्रथमत: जाळीत पकडले, मात्र त्यावेळी माकडाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने औषधे उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पकडलेल्या माकडाला पिंज-यात ठेवण्यात आले.
तत्पूर्वी माकडाला सुस्थितीत ठेवण्यासाठी वनपाल संग्राम मोरे व वनपाल सुरेश पटकारे यांनी प्रयत्न केले. माकड सुस्थितीत असलेबाबत पशूवैदयकिय अधिकारी भुईज यांना दाखवून सुस्थितीत असलेबाबत खात्री केली व त्यांच्या सल्ल्यानुसार 🐒 माकडाला पुण्यात राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले.
सदर कार्यवाही ही साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संग्राम मोरे, सुरेश पटकारे व इतर सर्व वन अधिकारी कर्मचारी व प्राणीमित्र यांनी एकत्रितपणे पार पाडली. माकड हा वन्यप्राणी असून तो वनात राहून त्याची गुजराण करत असतो. तो चुकून गावात आल्यास त्यास अन्न वैगेरे देणे टाळावे. म्हणजे तो एका ठिकाणी वास्तव्य करणार नाही. तो अन्नाच्या शोधात इतरत्र निघून जाईल. वन्यप्राण्याला
खादयपदार्थाचे आमिष दाखविणे कायदयाने गुन्हा असल्याचे सांगितले असुन तसे आवाहन नागरिकांना केले आहे.