दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुणे येथील यशोधन ट्रँव्हल्स यांच्या मार्फत वाई तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील सहावी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना भोर तालुक्यातील कोरले आणी वडतुंबी येथे शिक्षण घेण्यासाठी पायी जावे लागत होते. त्यांची अडचण ओळखून गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रकाश मोडक, शैलेंद्र मोडक, राकेश सर उपस्थित होते. वाई तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात असणारी पाखिरेवस्तीवरील जिल्हा परिषद शाळा ही केंजळगडाच्या पायथ्याशी असून इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंत वर्ग या शाळेत आहेत. पण पुढील 6 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी येथील मुलांना 6 वी 7 वी करता भोर तालुक्यातील कोर्ले गावात तर 8 वी ते 10 वीचे शिक्षण घेण्यासाठी भोर तालुक्यातीलच वडतुंबी येथे जावे लागते.
त्यामुळे असंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु लागल्याचे शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांच्यासाठी काय करता येईल याचा विचार केला. केंजळगड येथे पर्यटनाला येणारे जे पर्यटक आहेत,त्यांच्या माध्यमातून मुलांसाठी काय करता येईल का या विचारानं आज या विद्यार्थ्यांना 11 सायकली मिळवून दिल्या.
यशोधन ट्रॅव्हल्स पुणे यांच्या सहकार्याने प्रकाश मोडक, शैलेंद्र मोडक, राकेश, यांच्या दातृत्वाने पाकिरेवस्तीतून 6 वी ते 10 वी पर्यंत कोर्ले व वडतुंबी (तालुका- भोर, जिल्हा – पुणे) येथे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी 11 सायकल उपलब्ध करून दिल्या. ज्यामुळे या विद्यार्थ्यांची 12 किलोमीटर दररोज होणारी पायपीट कमी होणार आहे.
इयत्ता दहावीत शिकणारी प्रतीक्षा शंकर पाखिरे ही विद्यार्थिनी सातवीत असताना शालाबाह्य होऊन घरी राहिली होती. 2018 साली किरण पवार, राहूल शिंदे व केंद्रप्रमुख विजय भांगरे यांच्या सहकार्याने कोर्ले येथे तिने सातवीत प्रवेश घेतला होता. आज ती वडतुंबी हायस्कूल मध्ये दहावीत शिकत आहे. आज त्या विद्यार्थिनीला सायकल देताना या सायकलीची किंमत किती असेल? असे पवार यांनी विचारल्यावर तिने त्या सायकलीची किंमत आमच्यासाठी अनमोल आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.