दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील कोंढावळे गावच्या हद्दीतील मुरा परिसरातील डोंगररांगांमध्ये सायंकाळच्या वेळी बिबट्याने घराकडे परतत असलेल्या गाईंच्या कळपावर अचानक हल्ला चढवला यात एक गाय गंभीर जखमी झाली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत मात्र या बिबट्याला पकडण्यासाठी कोणतीच उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे.
काल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोंढावळे गावच्या हद्दीतील मुरा परिसरातील डोंगररांगांमध्ये चरण्यासाठी गाई गेल्या होत्या. हा कळप संध्याकाळी घरी परतत असताना गुराख्याच्या समक्ष बिबट्याने एका गाईवर हल्ला चढवला. यामध्ये प्रकाश भादू आखाडे यांची गाय गंभीर जखमी झाली.
गेल्या तीन महिन्यापासून वाई तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनेक गावांमध्ये बिबट्या आढळल्याची व त्याचा वावर दिसल्याची चर्चा आहे. मात्र वाईच्या वन विभागाकडून गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
वाई तालुक्यातील शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीत असताना वन विभाग मात्र गेंड्याची कातडी पांघरून काही न घडल्याचा आव आणत आहे. या ठिकाणी समाजहिताच्या भावना लक्षात घेणाऱ्या कार्यक्षम अधिकाऱ्याची येथे नियुक्ती व्हावी अशी येथील नागरिक मागणी करत आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्याचा धुमाकूळ डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये सुरू आहे या काळामध्ये अनेक शेळ्या, कुत्री बिबट्याने फस्त केल्या आहेत. या प्रकरणी वन विभागाकडे देखील लोकांनी तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत अशी माहिती येथील स्थानिकांनी दिली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना भेटून कार्यक्षम वनाधिकाऱ्यांची वाई तालुक्यासाठी नेमणूक करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती वासोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवघणे यांनी दिली.