महान्यूज सोशल मिडिया टीम
२०२१ हे वर्ष संपायला आता २१ दिवस उरले आहेत. हे सगळ वर्ष कोरोनाच्या संकटाच्या छायेत गेले. याचेच प्रतिबिंब या वर्षभराच्या ” टॉप गुगल सर्च ” वर पडलेले दिसते आहे.
गुगलने नुकतीच या वर्षभरात भारतातील लोकांनी गुगलवर कशाचा सगळ्यात जास्त शोध घेतला याची ” टॉप टेन ” यादी जाहिर केली आहे. यातील काही बाबी योग्य वाटल्या तरी काही बाबी आश्चर्य वाटणाऱ्या आहेत.
भारतीयांच्या या सर्वाधिक शोध घेतलेल्या विषयात पहिले नाव आहे इंडियन प्रिमियर लिगचे. भारतीयांचे क्रिकेट प्रेम कोरोनाच्या काळातही कायम राहिलेले आहे.
दुसरे नाव आहे, coWin कोवीड लसीकरणाची माहिती देणारे सरकारी पोर्टल. तिसरे पुन्हा भारतीयांच्या क्रिकेट प्रेमाची साक्ष देणारे आयसीसी टी २० वर्ल्ड कप.
चौथे आणि पाचवे नाव थोडे वेगळे आहे. चौथे आहे युरो कप, व पाचवे टोकियो ऑलिंपिक. भारतीयांची खेळातील रुची वाढते आहे हे यातून दिसते आहे.
सहावे आहे कोवीड व्हॅक्सीन. लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर भारतीयांनी जो उत्साह दाखवला त्याचे हे प्रतिक आहे. या उत्साहामुळेच आपण एवढी मोठी लोकसंख्या असूनही ५० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण करू शकलो आहोत.
सातवे नाव आहे. free Fire redeem code. हा एक ऑनलाईन गेम आहे. खुप मोठ्या संख्येने भारतात हा गेम खेळला जात असल्याचे दिसते आहे.
आठवे नाव आहे कोपा अमेरिका. भारतात फुलबॉल फारसा खेळला जात नाही. मात्र अमेरिकेतल्या या फुटबॉलच्या सामन्याबाबत भारतात एवढी उत्सुकता कशी काय आहे, हे समजणे जरा अवघड आहे.
नववे नाव आहे नीरज चोप्रा. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या या भालापटूचे भारतीयांना खुपच कौतुक आहे.
दहाव्या नावावर जे नाव आहे, नवव्या नावाच्या एकदम उलट आहे, ते आहे आर्यन खान. अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल बॉलिवु़ड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. त्याअगोदर फारसा चर्चेत नसलेला आर्यन खान त्यानंतर ऐवढा चर्चेत आला की त्याने टॉप सर्चमध्ये दहावा नंबर मिळवला.
आणखी एक लक्षात आले का ?
या सर्वाधिक शोधांच्या यादीत एकही राजकीय विषय किंवा व्यक्ती नाही. यातले सगळ्यात मोठा विषय आहे तो म्हणजे खेळ. या विषयावरील दहापैकी सहा सर्च आहेत. मात्र ही आवड खेळ खेळण्याची नसून खेळ बघण्याची आहे. कोविडमुळे घरी बसलेल्या भारतीयांनी इतर काही बघण्याऐवजी मोबाईलवर क्रिकेट आणि फुलबॉल बघण्यास जास्त पसंती दिली असे दिसते आहे.
दुसरा विषय आहे कोवीड. या विषयावरील दोन सर्च या यादीत आहेत.
तिसरा विषय आहे ऑनलाईन गेमचा. या विषयावरील एक सर्च या यादीत आहे. ऑनलाईन गेम खेळणारांचे प्रमाण किती मोठे आहे हे या सर्चमधून दिसते आहे.
यातून उरलेला एक सर्च म्हणजे आर्यन खानचा. या सर्चमध्ये मात्र राजकारण, धर्म, करमणूक यासारखे अनेक विषय एकत्रित झालेले दिसतात.
आपल्या देशातील लोकांना नेमका कोणत्या गोष्टीत रस आहे हे या सर्वाधिक शोधांतून काही प्रमाणात तरी आपल्याला कळून येईल.