दौंड : महान्यूज लाईव्ह
राजेंद्र झेंडे
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर दौंड तालुक्यात स्थालंतरीत आणि मयत मतदार यांच्या नावाखाली अंदाजे साडे आठ हजार मतदार यादीतून वगळण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज निवडणुक आयोगाच्या बेबसाईटवर करण्यात आले आहेत. हे अर्ज काहींकडून कोणतेही पुरावे नसताना बोगस दाखल करण्याचा प्रकार असल्याचे उघड होत आहे. या प्रकारामुळे दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या साडेआठ हजार मतदारांबाबत हरकती व आक्षेप घेण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे समर्थक मतदारांचा समावेश असल्याची चर्चा तालुक्यात असून या प्रकाराची चौकशी राज्य निवडणूक आयोगाने करावी अन्यथा आंदोलन करण्याचा पावित्रा तालुक्यातील काही राजकीय तसेच सामिजक कार्यकत्यांनी घेतला आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य निवडणुक आयोगाअंतर्गत जिल्हा निवडणुक विभागाकडून जिल्ह्यात नवीन अद्ययावत नवीन मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. मयत मतदार असलेल्या मतदारांचे नावे कमी करणे, स्थलांतरीत मतदार असलेल्या मतदारांची नावे कमी करणे, 18 वर्षापेक्षा कमी असलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणे, तसेच नवीन मतदार यांचे नाव नवीन मतदार म्हणून यादीत समाविष्ट करणे याबाबत 16 नोव्हेंबर रोजी जिल्हा निवडणुक आयोगाने गावोगावी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या ग्रामसभेत गावातील मयत मतदार, स्थलांतरीत मतदार आणि नवीन मतदार यांची चौकशी आणि खात्री करणे तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आल्या. तालुक्यातील बुहतांश गावांमधील ग्रामसभेत महसूल विभाग, पंचायत समिती व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ग्रामसभेतील चर्चेनंतर मतदार याद्यांची दुरूस्ती करून त्या नवीन मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्याचे काम सुरू आहे. काही गावांच्या मतदार याद्या अद्ययावत झाल्या आहेत. तर काहींची दुरूस्तीची काम सुरू आहेत. या मतदार यादीमध्ये काही आक्षेप हरकती , तक्रारी असल्यास निवडणुक आयोगाकडे आँनलाईन करण्यात येत आहेत. मात्र सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये काही मतदार मयत नसताना, स्थलांतरीत
झाले नसतानाही निवडणुक विभागाकडे ऑनलाईन आक्षेप, हरकती व तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एका गावांतून अंदाजे चारशे ते पाचशे याप्रमाणे तालुक्यात अंदाजे साडेआठ हजार असे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. हे अर्ज एकाच वेबसाईट वरून दाखल करण्यात आल्याचे काही मतदारांचे म्हणणे आहे. हा केवळ हे मतदार आपल्याला मतदान करणार नाहीत किंवा ते आपल्या पक्षाचे व गटाचे नाहीत म्हणून जाणीवपुर्वक या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळ्यासाठी खोडसाळ प्रयत्न केला जात आहे.
भाजप अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष आणि मळद येथील नामंकीत वकील अॅड.अझारूद्दीन मुलाणी यांनी
आपल्याबाबत असा प्रकार घडल्याचे सांगितल्याने हा सर्व प्रकार समोर आला. ८ डिसेंबर पर्यंत तालुक्यात अंदाजे साडेआठ हजार अर्ज दाखल केल्याचे समोर येत आहे. तालुक्यात अंदाजे पाच हजारांच्या आसपास मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याची चर्चा आहे. तर 18 वर्ष पुर्ण नसताना केवळ हे आपले मतदार असल्याने त्यांची नावे नवीन मतदार यादीत समाविष्ठ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ही होत असून तशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. याबाबत अॅड. दौलत ठोंबरे म्हणाले की, मतदार व्यक्ती हयात असतानाही तो मयत असल्याचे सांगत, त्याचे नाव कमी करण्यात यावे, तसेच स्थलांतरीत नाही, तरी तो मतदार स्थलांतरीत आहे, असा आक्षेप घेत मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केले गेले आहेत. हे अर्ज एकाच ठिकाणावरून करण्यात आले आहेत. हे व्यक्ती कोण आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून अशा प्रकारचे षडयंत्र रचले जात आहे. हा प्रकार म्हणजे संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा हा असंवैधानिक प्रयत्न काहींजण करीत आहेत. या प्रकरणात दौंड तहसीलदार आणि निवडणुक विभागाचे कामकाज करणारे अधिकारीही सामील आहेत. असा आरोप ठोंबरे यांनी केला असून, या याप्रकारची सखोल चौकशी करावी, तसेच दोषींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्य निवडणुक आयोगाकडे ते करणार आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे म्हणाले की, मतदार याद्यांमधील हा घोळ लवकरात लवकर मार्गी लावावा, बोगस मतदार याद्यांची दुरूस्ती करून नवीन अद्ययावत मतदार याद्या तयार कराव्यात, अन्यथा तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
याबाबत दौंड तहसीलदार संजय पाटील म्हणाले की, 8 हजार 260 च्या आसपास हरकती अर्थात सहा,सात व आठ नंबरचे अर्ज ऑनलाईन दाखल झाले आहेत. या अर्जांची हिगरींग चालु आहे. असा तक्रारी किंवा अर्ज दाखल झाल्या असल्या तरीही अर्ज किंवा तक्रारींची चौकशी करून खात्री केली जाणार आहे. त्यासाठी मतदार आणि तक्रारदार यांना नोटीस बजावण्यात येत आहे. अद्याप नवीन अद्ययावत यादी तयार झाल्या नाहीत. तपासणी व दुरूस्तीचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीबाबत दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी निर्णय घेतील. मतदारांनी गोंधळून जावू नये, मतदारांनी आपले नावे मतदार यादी आहे का नाही याची खात्री करावी व काही दुरूस्ती असेल तर अर्ज करून त्याची दुरूस्ती करावी.