महान्यूज टीम
भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांचे तामीळनाडूतील कोईम्बतूरजवळ निलगिरी पर्वतरांगात झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत अपघाती निधन झाले. आज दु. १२.३० च्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत बिपिन रावत यांच्यासह १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत घोषणा भारतीय वायुदलाकडून करण्यात आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बिपिन रावत यांच्या पत्नी, त्यांचे सचिव तसेच सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. या अपघातात बचावलेल्या एकमेव व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बिपिन रावत यांच्या या अपघाती मृत्यूबाबत शोक प्रकट केला आहे.
आज दुपारी बिपिन रावत अन्य १३ जणांसह वायुदलाच्या कोईम्बतूरजवळील ठाण्यावरून वेलिंग्डन लष्करी कर्मचारी महाविद्यालयात हेलिकॉप्टरने जात असताना निलगिरी पर्वतरांगात त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाल्याचे आता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.
बिपिन रावत हे भारताचे पहिले सीडीसी होते. भारताच्या लष्कराचे तीन विभाग होते. वायुसेना, नौसेना आणि स्थलसेना या तीनही विभागाचे प्रमुख वेगवेगळे असत. या तिन्ही सेनांमध्ये समन्वय साधण्यासाठी सीडीसी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात आले. या पदावरील बिपिन रावत हे पहिले अधिकारी होते.