घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह
नोटाबंदीच्या निर्णयानंतर २००० च्या नोटा बाजारात आणण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर आजपर्यंत विरोधक सतत प्रश्न उपस्थित करत आहेत. आता सरकारने संसदेत २००० च्या नोटांच्य उपलब्धतेवर दिलेल्या माहितीवरूनही पुन्हा नवे प्रश्न उभे राहण्याची शक्यता आहे.
आज केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत याबाबत माहिती दिली. मार्च २०१८ मध्ये २००० रुपयांच्या ३३६.३ कोटी नोटा बाजारात उपलब्ध होत्या. मात्र अवघ्या तीन वर्षात या नोटांच्या संख्येत घट होऊन आता २२३.३ कोटी नोटाच बाजारात उपलब्ध आहेत.
बाजारात असलेल्या नोटांच्या एकुण किंमतीमध्ये २००० रुपयांच्या नोटांच्या किंमतीचे प्रमाण २०१८ मध्ये ३७.२६ टक्के होते. पण ते आता केवळ १५.११ टक्के राहिलेले आहे.
केवळ ३ वर्षात ऐवढ्या नोटा कमी कशा झाल्या यावर केंद्रसरकारचे म्हणणे असे आहे की, या तीन वर्षात नव्याने २००० च्या नोटांची छपाई करण्यात आलेली नाही. खराब झाल्यामुळे किंवा फाटल्यामुळे नोटा चलनातून बाद होतात, याचप्रकारे २००० रुपयाच्या नोटाही कमी झाल्या आहेत.
अर्थातच सरकारच्या या म्हणण्यावर अनेक प्रश्न उभे राहणार आहेत.
२००० रुपयाच्या नोटा या कमी किंमतीच्या नोटांप्रमाणे फार हाताळल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांचे फाटण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण कमी असायला हवे. या स्थितीत केवळ तीन वर्षात ११३ कोटी नोटा बाजारात कमी कशा झाल्या, याचे स्पष्ट उत्तर सरकारकडून मिळालेले नाही.
या फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा रिझर्व्ह बॅंकेकडे जमा झाल्या आहेत का, यावर सरकारने या उत्तरात काही म्हणल्याची माहिती नाही.
कमी झालेल्या या नोटांचे मुल्य २ लाख २६ हजार कोटी इतके आहे. यामुळे एवढ्या मुल्याचे इतर नोटांच्या स्वरुपातील चलन बाजारात आले आहे का? याचेही उत्तर सरकारने दिलेल्या या माहितीतून मिळत नाही.