इंदापूर : महान्यूज लाईव्ह
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीन, दलित, श्रमिक, विस्थापितांच्या व शोषितांच्या अंध:कारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश देवून मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले, अशा शब्दात भिमाई प्राथमिक आश्रमशाळेच्या शिक्षिका मनिषा जगताप – मखरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ज्युनिअर कॉलेज, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला.त्यावेळी जगताप-मखरे बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, बाबासाहेबांना प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक,जल, कृषी,पत्रकारिता व कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ.आंबेडकरांनी दीन, दलित, श्रमिक,विस्थापितांच्या व शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे यांनी तथागत बुद्धांच्या मूर्तीस पुष्प व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर सामूहिक पंचशील व त्रिशरण घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. प्रा.जावेद शेख, भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे,संचालक गोरख तिकोटे ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.