इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम प्रगतीपथावर असून चालु सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये मंगळवार ( दि.7 ) अखेर 2 लाख 11 हजार 650 मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे, अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
कारखान्याचे दररोज प्रतिदिनी सरासरी 8000 मे. टन गाळप क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात आहे. कारखान्याने ऊस गाळपाचा 2 लाख मे. टनाचा पल्ला पार केल्याबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी सर्व उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प सध्या पुर्ण क्षमतेने चालु आहेत. कारखान्याने चालू हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास प्रति टन रुपये 2500 पेक्षा अधिकचा दर जाहीर केला असून शेतकऱ्यांना पहिला हप्ता प्रति टन रुपये 2100 प्रमाणे नियमितपणे अदा केला जात आहे. चालू हंगामामध्ये कारखाना सुमारे 12 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट निश्चितपणे पुर्ण करेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक देवराव लोकरे व अधिकारी उपस्थित होते.