दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा भाजप अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अँड.अझरुद्दीन मुलाणी यांचे व कुटुंबातील व्यक्तींची नावे दौंड तालुक्यातील मळद येथील मतदार यादीतून गायब झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जाणुनबुजुन हा प्रकार केला असल्याचा आरोप मुलाणी यांनी केला आहे.
याबाबत माहिती अशी की, मागील काही दिवसांपुर्वी दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मतदार यादीतील नावे तपासणी व दुरूस्ती करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र मतदार यादीत नाव नसल्याने आणि स्थलांतरीत मतदार असल्याबाबत अँड. मुलाणी यांना दौंड तहसील यांच्याकडून नोटीस आल्याने हा मतदार यादीतुन नाव गायब झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.
मुलाणी हे दौंडचे नामांकित वकील असून ते भाजप अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या सारख्या जबाबदार आणि सुशिक्षीत व्यक्तींचे नाव मतदान यादीतून गायब झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील मतदारांची नावेही अशाच प्रकारे मतदार यादीतुन वगळली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत अॅड.मुलाणी म्हणाले की, मी आमदार कुल यांचा आणि भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मात्र स्थानिक पातळीवर आमदार कुल यांच्याच काही कार्यकर्त्यांनी माझे आणि माझ्या कुटुंबातील तीन व्यक्तींची नावे जाणुबुजून खोडसाळपणाने मी स्थलांतरित असल्याचा कोणताही पुरावा नसताना मतदार यादीतून काढण्यासाठी तक्रार केली आहे.
मी आणि माझ्या कुटुंबाने यापुर्वी मळद गावातुन मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र आताच माझे आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. या प्रकाराची चौकशी करावी, तसेच तालुक्यात अशा प्रकारची ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत अशा मतदारांनीही दौंड तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी असे आवाहन अॅड,मुलाणी यांनी केले आहे.