महान्यूज टीम
गिफ्ट म्हणून मिळालेला ५२ लाखाचा घोडा आणि ९ लाखाची ४ मांजरे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला चांगलीच महागात पडण्याची शक्यता दिसते आहे.
मुंबई विमानतळावरून काही दिवसांपूर्वीच तिला परत पाठविण्यात आले होते. त्यावेळी चौकशी करून तिला सोडून देण्यात आले होते. परत आता ईडीने तिला परत नोटीस बजावली असून ८ डिसेंबर रोजी दिल्ली येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
ईडीची कार्यपद्धती पाहता चौकशीनंतर तिला अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२०० कोटींच्या मनी लॉंडरींग प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल व अन्य सहा जणांविरुद्ध तब्बल सात हजार पानी आरोपपत्र ईडीने दाखल केले आहे. या सुकेशसोबत जॅकलिनने आर्थिक देवाणघेवाण केल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत.
याच सुकेशकडून तिला ५२ लाखाचा घोडा, प्रत्येकी ९ लाख किंमतीची चार मांजरे याखेरीज हिरेजडित दागिन्यांसह अनेक महागड्या गिफ्ट दिल्या गेल्या आहेत. असे काही नसल्याचा दावा जॅकलिनने केला असला तरी तिचे सुकेशबरोबरचे फोटो व्हायरल झाले. ती अनेकदा सुकेशला भेटल्याचे स्पष्ट झाल्याने आता तिच्या अडचणी वाढत जाण्याची लक्षणे आहे.
सुकेश चंद्रशेखर याच्या बॉलिवुडशी संबंधित इतरही काही तारे आणि तारकांशी संबंध आल्याचे पुढे येत असून त्याच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथांची मोठी चर्चा आहे.