मुंबई : महान्यूज लाईव्ह
सैराट चित्रपटात दाखविलेल्या घटनेसारखी भयानक घटना महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे रविवारी दुपारी घडली आहे.
अल्पवयीन भावाने आईच्या मदतीने आपल्या गर्भवती बहिणीचे डोके तोडून तिची निर्घुण हत्या केली. या हत्येनंतर तिच्या तोडलेल्या शिरासोबत हे दोघे सेल्फी घेत होते. हा भयानक प्रकार पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला.
दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
किर्तीने अविनाश थोरात यांच्याशी विजापूर येथे २१ जून रोजी लग्न केले. त्यानंतर ते दोघे गयागाव येथे राहत होते. तिचे हे लग्न तिच्या लहान भावाला आणि आईला मान्य नव्हते. तिच्या आईने किर्तीला संपर्क साधून भेटण्यास येत असल्याचे सांगितले. यानंतर रविवारी तिची आई आणि भाऊ तिला भेटण्यासाठी आला.
किर्ती आई आणि भावासाठी चहा करीत होती, त्यावेळी दोघांनी तिच्यावर हल्ला केला. त्यावेळी तिचा पती अविनाश शेजारच्या खोलीत होता. तिच्या आईने तिला पकडून ठेवले आणि भावाने सोबत आणलेल्या हत्याराने तिचा गळा चिरला.
मदतीसाठी आलेल्या अविनाशवरही त्यांनी हल्ला चढवला. पण तो पळून गेल्यामुळे वाचला.
पोलिसांपुढे शरण जाण्यापूर्वी हे दोघे किर्तीचे शीर तिच्या शेजाऱ्यांना दाखवत होते आणि त्यासोबत सेल्फी घेत होते.
या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.