कोट्यवधींचा निधी आहे पण रस्ता शिल्लक नाही..असे सांगणारे या रस्त्याकडे लक्ष देणार का?
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील शहा या गावाकडे जायचं म्हटलं तर रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे गावात जायची इच्छाच होत नाही.. प्रचंड खड्ड्यांचा रस्ता म्हणून शहा गावच्या रस्त्याची ओळख होत आहे. पाऊस पडल्यावर तर दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.अनेक वेळा रस्त्याची मागणी करूनही रस्ता काही केल्या होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
इंदापूर तालुक्यात सर्व रस्ते मंजूर केले असून कोट्यावधींचा निधी आहे पण रस्ताच शिल्लक नाही..असे छातीठोकपणे सभांमध्ये सांगणारे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या रस्त्याकडे अद्याप का बरे लक्ष दिले नसावे.. हे ग्रामस्थांना न उलगडलेले कोडे असून असून या रस्त्यासाठी आतातरी मामा लक्ष देणार का? असा सवाल शहा ग्रामस्थांचा आहे.
‘शहा ‘ गावचा रस्ता अनेक वेळा विनंत्या करूनही का केला जात नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शहा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या भागात अनेक योजना राबविल्या जातात. अनेक कामे केली जात असल्याचा बोलबाला असताना रस्ता हे गावचे सौंदर्य किंवा गावचा आरसा म्हणून पाहिले जात असताना या रस्त्याला शहा गावचा खड्ड्यांचा रस्ता म्हणून चर्चा होऊ पाहत आहे.
या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात जागोजागी तळ्यांचे व डबक्यांचे स्वरूप निर्माण होते. तसेच या रस्त्यावर दुचाकीस्वारांना प्रवास करताना कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक दुचाकी घसरून अपघात होण्याचेही प्रमाण वाढले आहे. काल रविवारी दुपारी शहा गावचे प्रतिष्ठित नागरिक हिरालाल मुरलीधर चोपडे हे मोटरसायकलवरून या रस्त्यावरून जाताना घसरून पडले. यावेळी त्यांच्या पायाच्या घोट्याला जखम झाल्याचे पत्रकारांना निदर्शनास आणून दिले.
अनेक वेळा मागणी करूनही हा रस्ता होत नाही. यासाठी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मग प्रश्न असा पडतो की, अशी मागणी होत असताना ग्रामस्थांच्या या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असले तरी याला जबाबदार कोण ..? हा सवाल ग्रामस्थांचा आहे.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर या रस्त्याचे काम मंजूर असल्याचे सांगून लोकप्रतिनिधींच्या हस्ते या कामांचे उद्घाटन झाले होते. परंतु अजून काम चालू झाले नसल्याने सदर उद्घाटने फक्त निवडणुकीपुरता दिखावा केला गेल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली.
आता लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा याच रस्त्याच्या कामाचा नारळ फुटणार का? आणि पुन्हा इंदापूर तालुक्यात रस्त्यांच्या कामासाठी निधी भरपूर आहे पण रस्ताच नाही असे सुर भाषणांमध्ये ऐकू मिळणार का? असे प्रश्न काही ग्रामस्थांनी पत्रकारांसमोर मांडले आहेत.
जर हजारो कोटी रूपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी इंदापूर तालुक्यात उपलब्ध असेल व शहा गावचा रस्ता होत नसेल तर हे दुर्दैव आहे असे सांगत जर रस्ताचे काम तातडीने मार्गी न लागल्यास आपण शहा ग्रामपंचायतच्या सदस्यासह इंदापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा शहा ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब निकम यांनी दिला आहे. या वेळी शहा ग्रामपंचायत सदस्या सौ.जयश्री खबाले, सौ.अनिता गंगावणे, प्रताप खबाले यांनीही रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.