गडचिरोली : महान्यूज लाईव्ह
छत्तीसगडमधील खाणींच्या त्रासाला कंटाळून हत्तींचा एक कळप गडचिरोलीच्या जंगलात शिरला आहे. वनखाते सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवत असून हे हत्ती गडचिरोलीच्या जंगलाचे कायमचे रहिवासी होण्याची शक्यता त्यांना वाटते आहे. येथील त्यांचे वास्तव्य सुखाचे व्हावे यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न वनखात्याकडून केले जात आहेत.
१८ ते २० हत्तींचा हा कळप सध्या जंगलात भटकत आहे. या जंगलात त्यांना पाणी आणि खाद्याची कमतरता नाही. तसेच छत्तीसगडपेक्षा येथील जंगलांमध्ये माणसांचा वावर कमी आहे. त्यामुळे जर मार्चपर्यंत हा कळप परत छत्तीसगडला परतला नाही, तर गडचिरोली हे हत्तींचे नवे निवासस्थान ठरण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडच्या सीमेपासून २५ किमी अंतरावर कन्हारगाव टोला येथे प्रथम हा हत्तींचा कळप दिसल्यावर तेथील ग्रामस्थ भयचकीत झाले. परंतू हत्तींनी माणसांना त्रास दिला नाही किंवा शेतीचे नुकसान केले नाही. ते दाट जंगलाच्या दिशने निघून गेले, मात्र त्यांच्या वावरण्याने काही प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यापुर्वी दोन वर्षापूर्वी गडचिरोलीच्या जंगलात हत्तींचे दर्शन झाले होते, पण ते काही दिवसातच परत गेले होते. मात्र यावेळी ते अजून परत गेलेले नाहीत.
धानोरा आणि मुरुमगावच्या परिसरात गेल्या १५ दिवसापासून त्यांचे दर्शन होते आहे. हा कळप माणसांपासून लांब राहतो आहे, रात्रीच्या वेळेसच पाण्यासाठी ते मनुष्यवस्तीजवळ येताना दिसत आहेत. वनखाते त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहे.
आसपासच्या गावातील ग्रामस्थांचेही हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सहकार्य मिळत आहे. अजूनतरी हत्तींकडून शेती किंवा माणसांना त्रास झाल्याचे दिसलेले नाही.
गडचिरोलीत यापूर्वी जंगली हत्तींचे निवासस्थान असल्याची माहिती वनखात्याकडे नाही. त्यामुळे हे हत्ती गडचिरोलीत स्थाईक होतील का नाही, यावर वनखात्याचे लक्ष आहे.