इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सुरेश मिसाळ
गेल्या तीन दिवसांमध्ये इंदापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने फळबागा व इतर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने फळबागा व इतर नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदतीचा हात म्हणून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवारी रात्री जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने द्राक्षे, केळी, डाळिंब आदी फळबागांचे तसेच कांदा, शेवगा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये हा अवकाळी पाऊस सुमारे 70 ते 80 मी. मि. एवढा उच्चांकी झाला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झालेला नाही, त्यामुळे फळबागा व इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, झालेल्या आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अजूनही कोरोनाचे संकट शेतकऱ्यांवर असल्याने केळीसह शेती पिकांना चांगला बाजारभाव मिळालेला नाही. त्यात अवकाळी पावसामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटाचे भय उभे राहिले आहे.त्यामुळे शासनाने अवकाळी पावसाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी तात्काळ हालचाली कराव्यात अशी विनंतीही पाटील यांनी केली आहे.