बारामती : महान्यूज लाईव्ह
” मराठी भाषा आणि मराठी समाजाने कितीही अभिमान बाळगला तरी कमी पडेल अशी एक गोष्ट आहे. ती म्हणजे संत ज्ञानेश्वरांना एक बहीण होती आणि ती देखील कविता लिहित होती. युरोपमध्ये तर कुणीच कविता लिहणारी महिला नव्हती. ८०० वर्षांच सोडा, १८ व्या आणि १९ व्या शतकात फ्रान्समध्ये खुप मोठी महिला कादंबरीकार जॉर्ज सॅंड या पुरुषाच्या नावाने लिहायची. इंग्लडमध्ये एक महिला जॉर्ज एलिएट नावाने लिहायची. मोठ्या लेखिका असूनही त्यांना पुरुषांच्या नावाने लिहाव लागल. कारण बाई कस लिहू शकते असा विचार २०० – २५० वर्षांपूर्वी युरोपमध्ये होता. “
जावेद अख्तरांनी आपल्या भाषणात ही गोष्ट सांगितली. ते नाशिकच्या ९४ व्या अखिल मराठी संमेलनात बोलत होते. ते पुढे म्हणाले,
” आमच्याकडे ८०० वर्षापूर्वीची कवयित्री आहे. आपल्याला यावर अभिमान बाळगला पाहिजे. ही सामान्य गोष्ट नाही, खुप मोठी आहे. आपल्याकडे मुक्ताबाईच नाही तर त्यानंतर बहिणाबाईदेखील झाल्या. मीरा तर बहिणाबाईंच्या ४०० वर्षापूर्वी झाली. मात्र ८०० वर्षापूर्वी भारतात मराठीशिवाय कोणत्या इतर भाषेत महिला साहित्यिक असल्याची माझी माहिती नाही. त्यामुळेच भारताची पहिली महिला डॉक्टरदेखील महाराष्ट्रीय होती हे आश्चर्यकारक नाही. महाराष्ट्राच्या सभ्यतेत इतर ठिकाणांपेक्षा महिलांसाठी अधिक आदर होता. “
यावेळी बोलताना त्यांनी मराठी भाषा, मराठी साहित्याची थोरवी सांगितली तसेच आजच्या साहित्यिकांवरही टिप्पणी केली.
शांतता, कोर्ट चालू आहे, हे नाटक पाहून मी मराठी साहित्याच्या आणि विजय तेंडूलकरांच्या प्रेमात पडलो अशी कबुली त्यांनी दिली. त्यापूर्वी मला मराठी साहित्याची काहीच माहिती नव्हती. मराठीतील मोठा साहित्यिक तोच आहे ज्याने जनतेशी संवाद साधला, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ किंवा त्यााआधी संत ज्ञानेश्वर, त्यांचे भाऊ आणि बहिण मु्क्ताबाई असो. साहित्यिक ज्यावेळी सर्वसामान्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काही लोकांना वाईट वाटते, असेही ते म्हणाले.
कवी, लेखक जोपर्यंत चंद्र, प्रेम यावर लिहितो तोपर्यंत जुन्या राजा, महाराजांना आणि आताच्या जमिनदार, जहागिरदारांना आवडते. मात्र हेच साहित्यिक ज्यावेळी रस्त्यावरील चालणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील दु:खावर लिहतो, अश्रू आणि घामावर लिहतो तेव्हा त्यांना ते धोकादायक वाटतात. आधी त्यांना वाईट वाटायचे, आता तर हे साहित्यिक राष्ट्र्विरोधीदेखील होतात, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगतले.
साहित्यिकाने कोणत्याही पक्षाचे बांधील होऊ नये, आम्हाला जे वाटतं आम्ही ते बोलणार, ज्यांना आवडेल ते आवडेल, वाटेल वाटेल त्यांना वाईट वाटो. हे स्वातंत्र्य साहित्यिकाकडे असायल हवं. सत्य हे आहे की सामान्य नागरिक असो की साहित्यिक, हे स्वातंत्र्य कमी होत आहे, असे त्यांनी नमूद केले.